रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी आलीच पाहिजे, अन्यथा कारवाई! आजपासून कडक तपासणी
महाराष्ट्रात राहायचे असेल, व्यवसाय करायचा असेल तर मराठी भाषा आलीच पाहिजे असे पुन्हा एकदा सांगताना, मराठी न बोलणाऱया रिक्षा-टॅक्सीचालकांवर 1 मेपासून कारवाई होणारच, त्याबद्दल कुणीही संभ्रमात राहू नये, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
प्रताप सरनाईक यांनी आज पिंपरी-चिंचवड येथील एसटी आगाराची पाहणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मराठीच्या मुद्दय़ावर आपली भूमिका स्पष्ट केली. मराठी सक्तीचा नियम राज्य शासनाने 1989 मध्येच केला होता, आता त्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आली आहे. 1 मेपासून या नियमाची कडक अंमलबजावणी आणि कारवाई सुरू होणार आहे, असे सरनाईक म्हणाले.
आता मराठी शिकणे हाच एकमेव पर्याय
कारवाईच्या भीतीने रिक्षा- टॅक्सीचालकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे पत्रकारांनी सरनाईक यांना विचारले असता, त्यावर मराठी शिकणे हाच उत्तम पर्याय असल्याचे ते म्हणाले. मराठी भाषा शिकता यावी म्हणून रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी मार्गदर्शक पुस्तिका तयार करण्यात आली आहे. ती सर्व आरटीओ कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे, असे त्यांनी सांगितले.
Comments are closed.