मराठीचं नाव काढल्यावर मुख्यमंत्र्यांना मिरच्या का झोंबतात?; संजय राऊत यांचा सवाल
महाराष्ट्रातील मराठी भाषेचे अस्तित्व आणि सीमाप्रश्नावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. भाषेच्या नावाखाली होणारी मारहाण अमान्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यानंतर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. जे लोक महाराष्ट्रात पाहुणे म्हणून चार दिवस येतात, त्यांना भाषा शिकण्याची सक्ती आम्ही करत नाही, परंतु जे इथे वर्षानुवर्षे राहून कामधंदा करू इच्छितात, त्यांना मराठी आलीच पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही हीच भूमिका होती, याची आठवण करून देतानाच, मराठीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना मिरच्या का झोंबतात, असा सवाल त्यांनी विचारला. भाषावार प्रांतरचना का झाली, याचा अभ्यास मुख्यमंत्र्यांनी करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
सीमाप्रश्नावरून सरकारवर हल्लाबोल करताना संजय राऊत म्हणाले की, बेळगावसह 865 गावांचा जोपर्यंत महाराष्ट्रात समावेश होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र अपूर्ण आहे. मात्र, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा भाजपच्या मंत्र्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकदाही सीमावासी बांधवांचा साधा उल्लेख तरी केला आहे का, याचे त्यांनी आत्मचिंतन करावे. बेळगावमध्ये मराठी माणसावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल आणि मराठी भाषा दडपण्याच्या प्रयत्नांबद्दल मुख्यमंत्र्यांनी साधी संवेदनाही व्यक्त केलेली नाही. गेल्या 17 वर्षांपासून सीमाभागाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी कधी वकिलांची बैठक घेऊन खटला पुढे का सरकत नाही, याबाबत विचारणा केली आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपण तिकडच्याही मराठी माणसांचे मुख्यमंत्री आहोत, याची जाणीव त्यांना का होत नाही, असेही ते म्हणाले.
संयुक्त महाराष्ट्र लढ्याशी ज्यांचा काडीमात्र संबंध नव्हता, असे लोक आज सत्तेवर बसले आहेत, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली. सीमाभागासाठी स्वतंत्र मंत्रालय आणि दोन मंत्र्यांची घोषणा करण्यात आली असली, तरी शंभूराज देसाई किंवा चंद्रकांत पाटील यांनी कधी बेळगावात जाऊन तिथल्या मराठी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत का? असा मुद्दाही संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून कधी बेळगावात पाऊल ठेवले आहे का, हे त्यांनी सांगावे. या सरकारला महाराष्ट्र आणि सीमाभागातील मराठी बांधवांची कोणतीही चिंता नसल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.
Comments are closed.