धक्कादायक कृत्य! हॉटेलच्या बाथरूममध्ये लपून महिला खेळाडूंचा व्हिडिओ, 2 क्रिकेटपटू अटकेत…

श्रीलंका क्रिकेट अंतर्गत खेळणाऱ्या श्रीलंका अंडर-19 संघातील दोन खेळाडूंशी संबंधित अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोलंबोमधील नाराहेनपीटा परिसरातील एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित खेळाडूंनी महिला खेळाडू राहत असलेल्या खोलीजवळील बाथरूममध्ये गुपचूप मोबाईल फोन ठेवून त्यांचे व्हिडिओ चित्रीत केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे क्रीडा विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

महिला खेळाडूंना संशय आल्यानंतर त्यांनी तात्काळ हॉटेल व्यवस्थापन आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी वेगाने कारवाई करत दोन्ही आरोपी खेळाडूंना अटक केली. काही वेळ कोठडीत ठेवल्यानंतर न्यायालयाने त्यांना प्रत्येकी 5 लाख श्रीलंकन रुपयांच्या जामिनावर सोडण्याचे आदेश दिले. सध्या नाराहेनपीटा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, संबंधित व्हिडिओ कुठेही शेअर किंवा प्रसारित झाले आहेत का, याचाही शोध घेत आहेत.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, या आठवड्याच्या सुरुवातीलाच ही घटना समोर आली. महिला खेळाडूंनी बाथरूममध्ये संशयास्पद हालचाली लक्षात घेतल्यानंतर तक्रार केली आणि त्यातून हा प्रकार उघड झाला. आरोपी खेळाडूंना अलुथकडे मजिस्ट्रेट न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील सुनावणी 25 मे रोजी होणार आहे.

दरम्यान, श्रीलंका क्रिकेट बोर्डामध्येही मोठे प्रशासकीय बदल झाले आहेत. सरकारच्या दबावानंतर बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्रित राजीनामे दिले असून, नव्या अंतरिम समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीकडूनच आता या प्रकरणाची चौकशी आणि पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे. अद्याप अधिकृतपणे कोणतीही शिस्तभंगाची कारवाई जाहीर करण्यात आलेली नसली तरी, या घटनेची गंभीरता लक्षात घेता कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात.

क्रीडा क्षेत्रात, विशेषतः अंडर-१९ स्तरावर, अशा प्रकारच्या घटना घडणे अत्यंत चिंताजनक मानले जात आहे. खेळाडूंना लहान वयातच शिस्त, जबाबदारी आणि नैतिक मूल्यांचे शिक्षण देणे किती महत्त्वाचे आहे, यावरही या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर आरोप सिद्ध झाले, तर संबंधित खेळाडूंवर केवळ क्रीडा कारवाईच नव्हे तर कायदेशीर पातळीवरही कठोर शिक्षा होऊ शकते.

Comments are closed.