‘ब्राउन बॉय’ म्हणून हिणवलं, शारिरीक संबंध ठेवण्यास दबाव; JP मॉर्गनच्या महिला अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्याचे गंभीर आरोप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

न्यूयॉर्क मधील नामांकित कंपनी जेपी मॉर्गन चेस सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या कंपनीतील वरिष्ठ अधिकारी लोर्ना हजदिनी यांच्यावर त्यांच्या कंपनीतील एका कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण आणि मानसिक छळाचे धक्कादायक आरोप केले आहेत. या प्रकरणाविरोधात पीडित कर्मचाऱ्याने न्यूयॉर्कच्या न्यायालयात खटला दाखल केला आहे.

एबीपी न्युजने दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षेच्या कारणात्सव पीडित कर्मचाऱ्याचे नाव अद्याप जाहिर करण्यात आलेले नसून त्याने ‘जॉन डो’ या टोपन नावाने न्यायालयात खटला दाखल केला आहे. तक्रारीनुसार, या 2024 मध्ये या प्रकरणाची सुरूवात झाली. कामाच्या ठिकाणी हजदिनी यांनी पीडित कर्मचाऱ्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांनी शारीरिक स्पर्श करून कर्मचाऱ्याला भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याला ड्रिंक्ससाठी बोलावून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. कर्मचाऱ्याने विरोध केल्यावर, मी तुझी बॉस आहे हे विसरू नकोस, जर तू माझे ऐकले नाहीस तर मी तुला बर्बाद करेन, अशा शब्दांत हजदिनी यांनी त्याला धमकावले होते.

लोर्ना हजदिनी वारंवार पीडित कर्मचाऱ्याला धमकवण्याचा प्रयत्न करत होत्या. एवढेच नाही तर त्याला अमली पदार्थ देऊन (रोहिप्नोल) त्याचा गैरफायदा घेतला. त्याच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप कर्मचाऱ्याने केला आहे. एकदा हजदिनी थेट त्याच्या घरी पोहोचल्या आणि तिथेही त्यांनी जबरदस्ती केली. यावेळी कर्मचाऱ्याला रडू कोसळले, मात्र त्याची दया न येता हजदिनी यांनी त्याची थट्टा केली आणि त्याच्या पत्नीबद्दलही अत्यंत अपमानास्पद टिप्पण्या केल्या, असे या दाव्यात म्हटले आहे.

केवळ लैंगिक अत्याचारच नाही, तर पीडित कर्मचाऱ्याला त्याच्या वर्णवरूनही लक्ष्य करण्यात आले. त्याला ‘ब्राउन बॉय’ आणि ‘इंडियन’ म्हणून हिणवले गेले. मॅनेजमेंटला तुझ्यासारख्या लोकांना पुढे पाठवण्यात रस नाही, असे म्हणून त्याचे खच्चीकरण करण्यात आले. मे 2025 मध्ये या कर्मचाऱ्याने कंपनीकडे अधिकृत तक्रार केली होती, परंतु जेपी मॉर्गनने अंतर्गत चौकशीनंतर हे आरोप फेटाळून लावत या प्रकरणाबाबत कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे कंपनीने सांगितले.

सध्या हे प्रकरण न्यायालयात असून पीडित कर्मचाऱ्याने नुकसानभरपाईची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे त्याला आपली नोकरी गमवावी लागली असून तो मानसिक तणावाखाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.