मृतांचे हृदय, मेंदू अन् आतडी हिरवट पडली, विषबाधा की घातपात? कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरण
टरबूज मृत्यू प्रकरण मुंबई : मुंबईतील (Mumbai) पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता एक नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. प्राथमिक फॉरेन्सिक (Forensic) चाचणीत मृतांचे महत्त्वाचे अवयव ‘हिरवट’ पडल्याचे समोर आले असून, यामुळे या मृत्यूंमागचे गूढ अधिकच वाढले आहे.
Watermelon Death Case Mumbai: काय आहे फॉरेन्सिक अहवालात?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृतांच्या शवविच्छेदनानंतर समोर आलेल्या प्राथमिक अहवालात त्यांच्या शरीरातील मेंदू, हृदय आणि आतडी यांसारखे मुख्य अवयव हिरवट रंगाचे झाल्याचे आढळले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, सामान्य अन्न विषबाधेत (Food Poisoning) अशा प्रकारचे बदल सहसा दिसून येत नाहीत. जेव्हा शरीरातील अनेक अवयवांमध्ये एकाच वेळी असे बदल दिसतात, तेव्हा तो एखाद्या अत्यंत तीव्र विषारी घटकाचा परिणाम असू शकतो, असे संकेत डॉक्टरांनी दिले आहेत.
Watermelon Death Case Mumbai: शरीरात आढळले ‘मॉर्फिन’
या प्रकरणातील दुसरा मोठा खुलासा म्हणजे कुटुंबातील सदस्य अब्दुल्ला यांच्या शरीरात ‘मॉर्फिन’ हे अंमली द्रव्य आढळले आहे. कलिंगड खाल्ल्यानंतर कुटुंबाचा मृत्यू झाला की त्यामागे आणखी काही घातपाताचे कारण आहे, या दिशेने आता तपास सुरू झाला आहे.
Watermelon Death Case Mumbai: नेमकं प्रकरण काय?
25 एप्रिल रोजी पायधुनीतील डोकाडिया कुटुंबाने रात्री कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर काही वेळातच कुटुंबातील चौघांनाही उलट्या, चक्कर आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. 26 एप्रिलला प्रकृती अधिक खालावल्याने दोन्ही मुली बेशुद्ध पडल्या. त्यांना तात्काळ जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान दोन्ही मुली आणि त्यांच्या पाठोपाठ पालकांचाही मृत्यू झाला. सुरुवातीला हा मृत्यू कलिंगडामुळे झालेल्या विषबाधेतून झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, आता अवयवांचा बदललेला रंग आणि मॉर्फिनचा अंश सापडल्याने या प्रकरणाला गुन्हेगारी वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. आता या प्रकरणात आणखी काय धक्कादायक खुलासे होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.