नुसतं संचलन करून होणार नाही, महाराष्ट्रात मराठी माणसांचा बुलंद आवाज राहिला पाहिजे! – संजय राऊत

महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन यांचे अतूट नाते अधोरेखित करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे रोजीच का झाली, यामागचा ऐतिहासिक संघर्ष सांगताना राऊत म्हणाले की, मुंबई ही परंपरेने कामगारांची आणि कष्टकऱ्यांची आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबईतील गिरणी कामगार लाखोंच्या संख्येने उतरले होते आणि या लढ्यात बलिदान देणाऱ्या १०६ हुतात्म्यांमध्ये बहुसंख्य कामगारच होते. या कष्टकऱ्यांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठीच 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून निवडण्यात आला, याची आठवण त्यांनी करून दिली. केवळ संचलन करून, सलामी देऊन किंवा ध्वजवंदन करून हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली अर्पण करता येत नाही, असे सांगत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र निर्माण झाला. 67 वर्ष होत आली. आजही हा महाराष्ट्र अखंड आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, मुंबई इतर महाराष्ट्र आणि आपण प्रत्येक महाराष्ट्र दिन उत्सव म्हणून साजरा करतो आणि आजही. काल मध्यरात्री 30 तारखेला हुतात्मा चौकात जाऊन हुतात्मा स्मारकाला अभिवंदन केले आम्ही. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसैनिक गेलो होतो. तिथे विदारक चित्र दिसले. उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले. हुतात्ना स्मारकाची अवस्था दारुण आहे. अक्षरशा तडे गेलेले आहेत. बाकी सर्व इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही उभं करताय आज मिसिंग लिंकला तुम्ही जाऊन उद्घाटन करताय, केव्हातरी महाराष्ट्र दिन सोडून हुतात्मा स्मारकापाशी जा आणि त्याची पाहणी करा. ते मुंबई महानगर पालिकेच्या अखत्यारित येते. खरं असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत तिथे जाऊन हुतात्मा स्मारकाची स्थिती पाहायला पाहिजे.

हुतात्मा स्मारकाच्या निर्मितीमध्ये जे सुशोभीकरण आहे त्यामध्ये शिवसेनेचा फार मोठा वाटा आहे. छगन भुजबळ महापौर होते त्याकाळात सुरुवात झाली ती सातत्याने कायम राहिली. नुसतं महाराष्ट्रादिनी संचलन करून, सलामी घेऊन, ध्वज वंदन करून हुतात्म्यांना मानवंदना दिली असे होत नाही. मुंबईवर मराठी माणसाचंच वर्चस्व राहिले पाहिजे. महाराष्ट्रात मराठी माणसांचाच बुलंद आवाज राहिला पाहिजे, महाराष्ट्र कधीही दिल्लीचा गुलाम होऊ नये यासाठी तो लढा झाला. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी त्यावेळीच्या राज्यकर्त्यांनी, धनिकांनी, उद्योगपतींनी, व्यापाऱ्यांनी जे षडयंत्र रचल होतं की मुंबई महाराष्ट्राला मिळू नये, त्याविरोधामध्ये मराठी गिरणी कामगारांनी केलेलं ते बंड होतं. त्यात अनेक महत्वाचे नेते, मग प्रबोधनकार ठाकरे, कॉम्रेड डांगे, आचार्य अत्रे, अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख असे असंख्य लोकं होती. या लोकांनी महाराष्ट्र पेटवला, ढवळून काढला आणि ही लढाई झाली आणि त्यानंतर मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला. तो टिकवणं हे मोठं आव्हान आहे, जी परिस्थिती आम्ही जगतोय, सरकारची जी भूमिका आहे, ती लढाई भांडवलदारांविरोधातच होती आणि आज पुन्हा एकदा मुंबई भाडवलदारांच्या घशात घालताना सरकार दिसतंय असे संजय राऊत म्हणाले.

Comments are closed.