युगेंद्र पवारांनी बारामतीत सुनेत्राकाकींचं मताधिक्य सांगितलं; पवार vs पवार निवडणुकीवरही बोलले

मुंबई : राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकांसाठी 19 एप्रिल रोजी राज्यात मतदान झालं. बारामती आणि राहुरी मतदारसंघात झालेल्या या मतदानानंतर आता 4 मे रोजीच्या निकालात महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयी मताधिक्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांविरुद्ध (Sunetra Pawar) महाविकास आघाडीने आपला उमेदवार दिला नव्हता, तर राहुरीतही भाजप महायुतीच्या अक्षय कर्डिले यांच्याविरोधात महाविकास आघाडीची ठोस भूमिका दिसून आली नाही. त्यामुळे, हे दोन्ही विजय निश्चित मानले जात आहेत. त्यातच, बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा नवा रेकॉर्ड करण्यासाठी मतदान करा, असे आवाहन मुख्यमंत्र्‍यांसह सर्वांनीच केले होते. आता, युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी सुनेत्रा पवारांच्या विजयाचं मताधिक्य सांगितलं आहे.

युगेंद्र पवार यांनी बारामतीमधील पाणी प्रश्नांच्या संदर्भात पत्रकार परिषद घेत पुरंदर उपसा सिंचन आणि जाणाई शिरसाईचे पाणी बारामतीतील जिरायती पट्ट्याला मिळावे यासाठी आपण प्रयत्नशील होतो, आपल्या प्रयत्नांना यश आलेला आहे, अशी माहिती दिली. यावेळी, राजकीय प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा काकींसमोर कुठलाही स्ट्राँग उमेदवार नव्हता. येथील मतदारसंघात 2 लाख 24 हजार मतदान झालं आहे, त्यापैकी दोन लाख वीस हजार मतांनी सुनेत्रा काकी निवडून येतील आणि त्यांचा रेकॉर्ड होईल, असा विश्वास युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला. तसेच, पवार विरुद्ध पवार हे व्हायलाच नको, असे म्हणत सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावरही त्यांनी भाष्य केलं.

पवार विरुद्ध पवार नकोच (Baramati Pawar vs Pawar)

पवार विरुद्ध पवार अशी लढत व्हायला नको हे म्हणणं आहे. याआधी मी देखील बोललो आहे, जय देखील बोलला आहे. काल सुप्रियाताईंचं वक्तव्य मी ऐकलं. सुनेत्रा काकी देखील बोलल्या आहेत. त्यामुळे आम्ही कुटुंब म्हणून एक असलं पाहिजे, पवार विरुद्ध पवार अशी लढाई व्हायला नाही पाहिजे, अशी भूमिका युगेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवली.

विमान दुर्घटनेची सखोच चौकशी व्हावी

अजित दादांच्या विमान अपघातात संदर्भात आमचं म्हणणं एवढंच आहे की, सत्य समोर आलं पाहिजे. अनेक प्रश्न आहेत, जो डीजेसीएचा अहवाल आला होता त्यामध्ये अनेक त्रुटी आम्हाला आढळल्या. त्यामुळे वेगवेगळ्या बाजूने तपास होत असला तरी यातून सत्य बाहेर आलं पाहिजे, असे युगेंद्र पवार यांनी म्हटलं.

पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागला, अजित पवारांची आठवण

सध्या आपण टंचाईग्रस्त दौरा करतो आहोत, इथे अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. ज्यावेळेस लोकांनी मला सांगितलं पाण्याचा प्रश्न गंभीर आहे त्यावेळेस मी स्वतः प्रयत्न करून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सिंचन भवन येथे जाऊन भेटलो. अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर अधिकाऱ्यांनी चांगला प्रतिसाद देत पाणी सोडण्याचा आश्वासन दिलं आणि त्या पद्धतीने पाणी शेतकऱ्यांना मिळत आहे. पवार साहेबांचा आदर्श घेऊन आपण काम करत आहोत, दादा जोपर्यंत होते तोपर्यंत पाण्याचे प्रश्न भेडसावत नव्हते. मात्र, आता अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे, त्यावरती आपण मार्ग काढत आहोत, असेही युगेंद्र यांनी म्हटलं. दोन-तीन प्रोजेक्ट आहेत ते आपण मार्गी लावण्याचे काम करतो आहे, दादांचे स्वप्न होतं की कऱ्हा आणि नीरा स्थिरीकरण झालं पाहिजे. दादा असते तर आज ते काम मार्गी लागलं असतं. कऱ्हा आणि निरा स्थिरीकरण झालं तर पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. लोकांचे प्रश्न सोडवणे हे आमची जबाबदारी आहे, त्यामुळे कोणत्याही निवडणुकीची पर्वा न करता आम्ही लोकांसाठी काम करतो आहे. शरयू फाउंडेशन गेल्या काही वर्षापासून सातत्याने लोकांसाठी काम करत आहे, पवार साहेब देखील दौरा करत होते. दुष्काळी भागात आपण मोठ्या प्रमाणात काम केलेला आहे. शरयु फाउंडेशनच्या माध्यमातून त्याच पद्धतीने आपण आपले काम सुरू ठेवणार आहे, असेही युगेंद्र यांनी म्हटले.

हेही वाचा

Video: देवेंद्र फडणवीसांनी मागितली द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची माफी; मिसिंग लिंकचं लोकार्पण, ‘नवं’ नावही सांगितलं

आणखी वाचा

Comments are closed.