मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरात वाहतूक कोंडी; ग्रामस्थ संतप्त, रुग्णवाहिकाही अडकली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर परिसरात सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या रखडलेल्या कामामुळे सोनवी चौकात अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोनवी पुलाची एक मार्गिका 31 मार्चपूर्वी सुरू करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याने गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वारंवार कोंडी होत आहे. 1 मेपासून सलग सुट्ट्या आल्याने वाहनांची संख्या वाढली आणि परिस्थिती अधिकच बिकट झाली.

आज सकाळी 6 वाजल्यापासूनच कोंडीला सुरुवात झाली आणि वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटर लांब रांगा लागल्या. गुगल मॅपच्या मदतीने पर्यायी मार्ग वापरणाऱ्या वाहनांनी संगमेश्वर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात प्रवेश केल्याने तेथेही वाहतूक ठप्प झाली. सकाळपासून सुरू झालेली ही कोंडी दुपारपर्यंत कायम होती. याचदरम्यान बुरंबी-करंबेळे दरम्यान वडाचे झाड कोसळल्याने संगमेश्वर-देवरुख मार्गावरील वाहतूकही बंद पडली. परिणामी एसटी बसना पर्यायी मार्गाने वळवावे लागले आणि वाहनचालकांना दुहेरी अडचणींचा सामना करावा लागला.

संगमेश्वर ते माभळे दरम्यान महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. मातीचे डायव्हर्जन, सर्विस रोडचा अभाव आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजनांची कमतरता यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार आहे. धामणी ते लांजा दरम्यान अनेक कामे अपूर्ण असतानाही टोल नाके सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्याने वाहनचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कोंडीदरम्यान शास्त्री पुलाजवळून सायरन वाजवत येणाऱ्या रुग्णवाहिकेलाही मार्ग मिळू शकला नाही. दोन्ही बाजूंनी वाहनांची अनियमित हालचाल झाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीसही अनुपस्थित असल्याने वाहनचालकांमध्ये रोष वाढला.

कामाच्या संथ गतीमुळे संतप्त ग्रामस्थांनी यापूर्वी रास्ता रोको आंदोलन केले असून, 5 मे रोजी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. उन्हाळ्यात धुळीचा त्रास वाढत असून, पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने लक्ष घालून कामे पूर्ण करावीत, तसेच सोनवी पुलावरील एक मार्गिका त्वरित सुरू करावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Comments are closed.