अमेरिकन नाकेबंदीचा इराणला मोठा फटका, २० दिवसांत ४५ हजार कोटींचे नुकसान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेने केलेल्या नौदल घेराबंदीमुळे इराणला प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. गेल्या २० दिवसांत इराणचे सुमारे ४.८ अब्ज डॉलर म्हणजेच साधारण ४५ हजार कोटी रुपयांचे तेल महसुलाचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात ‘टीव्ही९ भारतवर्ष’ने वृत्त दिले आहे.

३१ तेल टँकर समुद्रात अडकले

वृत्तानुसार, १३ एप्रिलपासून सुरू झालेल्या या नाकेबंदीमुळे ओमानच्या आखातात इराणचे ३१ तेल टँकर अडकून पडले आहेत. यामध्ये सुमारे ५.३ कोटी बॅरल कच्चे तेल असून, अमेरिकेच्या कारवाईमुळे हे जहाज पुढे जाऊ शकत नाहीत. परिणामी इराणची तेल निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. शांतता चर्चेत दबाव निर्माण करण्यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. पेंटागनच्या माहितीनुसार, आतापर्यंत ४० हून अधिक जहाजांना माघारी धाडण्यात आले असून दोन जहाजे जप्त करण्यात आली आहेत.

तेल साठवणुकीची समस्या आणि उत्पादनावर टांगती तलवार

इराणमधील जमिनीवरील तेल साठवणुकीची ठिकाणे आता पूर्णपणे भरली आहेत. त्यामुळे इराण आता जुन्या जहाजांचा वापर तेल साठवण्यासाठी करत आहे. तज्ज्ञांच्या मते, जर ही परिस्थिती अशीच राहिली तर आगामी काही आठवड्यांत इराणला आपल्या तेल विहिरींमधील उत्पादन बंद करावे लागू शकते. अमेरिकन नाकेबंदी टाळण्यासाठी काही इराणी टँकर आता पाकिस्तान आणि हिंदुस्थानच्या किनारपट्टीवरून लांबचा व महागडा प्रवास करून मलक्का सामुद्रधुनीमार्गे चीनला तेल पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Comments are closed.