BCCIने परवानगी देताच अर्जुन तेंडुलकर SOLD OUT, किती लाखांची लागली बोली? कोणत्या संघाने घेतला? ज

अर्जुन तेंडुलकर T20 मुंबई लीग लिलावात विकला गेला : आयपीएल 2026 (IPL 2026) चा थरार सुरू असतानाच मुंबईच्या क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आगामी मुंबई टी-20 लीगसाठी (MPL) आज पार पडलेल्या लिलावात महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा, अर्जुन तेंडुलकर याला ‘आर्क्स अंधेरी’ (Arcs Andheri) संघाने 10 लाख रुपयांना खरेदी केले आहे. अर्जुनची बेस प्राईज 2 लाख रुपये होती, मात्र बोली लागून त्याला 10 लाख रुपयांत संघात स्थान मिळाले. आर्क्स अंधेरी (Arcs Andheri) या संघाने त्याला विकत घेतल. अर्जुन सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोवा संघातून खेळत असला, तरी बीसीसीआयच्या विशेष परवानगीमुळे तो या लीगसाठी पात्र ठरला आहे.

गोव्याकडून खेळूनही मुंबई लीगमध्ये संधी कशी?

अर्जुन तेंडुलकर सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोवा संघाचे प्रतिनिधित्व करतो. तो गोव्याकडून रणजी करंडक खेळत असल्याने, तो मुंबईच्या लीगमध्ये खेळू शकणार की नाही? याबाबत मोठी साशंकता होती. मात्र, लिलावाच्या दिवशी एक मोठा ट्विस्ट समोर आला. बीसीसीआयच्या (BCCI) विशेष नियमामुळे अर्जुनचा या लीगमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बीसीसीआयच्या नियमांनुसार, खेळाडूंना अतिरिक्त शारीरिक ताण येऊ नये म्हणून एका 12 महिन्यांच्या कालावधीत (IPL वगळता) फक्त एकाच अधिकृत टी-20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी असते.

जर एखाद्या खेळाडूने गेल्या 12 महिन्यांत इतर कोणत्याही राज्याची टी-20 लीग खेळली नसेल, तर तो दुसऱ्या राज्याच्या लीगसाठी पात्र ठरू शकतो. अर्जुनने गेल्या वर्षभरात कोणत्याही राज्यस्तरीय टी-20 लीगमध्ये भाग घेतलेला नाही. त्यामुळे तो तांत्रिकदृष्ट्या मुंबई टी-20 लीगसाठी पात्र ठरला आणि आर्क्स अंधेरीने हीच संधी साधली. आता रणजीमध्ये गोव्याकडून खेळल्यानंतर, जूनच्या पहिल्या पंधरवड्यात तो मुंबईच्या घरच्या मैदानावर ‘आर्क्स अंधेरी’साठी गोलंदाजी करताना दिसेल.

IPL मध्ये अद्याप खेळण्याची संधी नाही

अर्जुन तेंडुलकर सध्या आयपीएल 2026 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघाचा भाग आहे. त्याला लखनऊने ट्रेडद्वारे आपल्या संघात घेतले होते. आयपीएलमध्ये अद्याप खेळण्याची संधी मिळाली नसली, तरी आता मुंबई टी-20 लीगच्या माध्यमातून त्याला आपली चमक दाखवण्याची मोठी संधी मिळणार आहे.

मुंबई टी-20 लीग कधी होणार सुरू?

मुंबई टी-20 लीगचा हा चौथा हंगाम असून आयपीएल संपल्यानंतर लगेचच म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात हा थरार सुरू होणार आहे. या लिलावात पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांतील एकूण 2,411 खेळाडूंचा सहभाग होता. अर्जुनसोबतच इतर अनेक स्थानिक युवा खेळाडूंवरही मोठी बोली लावण्यात आली आहे.

हे ही वाचा –

IPL 2026 News : विराट कोहली शिव्या देतो, हातवारे करतो, तेव्हा कुठे जातो नियम?, जेमिसनवर कारवाईनंतर BCCIवर दुजाभावाचे आरोप

आणखी वाचा

Comments are closed.