सुनेत्रा पवार नसरापुरात, पीडित मुलीच्या घरातून मुख्यमंत्र्यांना फोन

पुणे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नसरापूरमध्ये हत्या (Nasrapur Girl Death) झालेल्या मुलीच्या पुण्यातील घरी सांत्वन पर भेट दिली. यावेळी या मुलीचे कुटुंबीय आणि आजुबाजूच्या लोकांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे आरोपीच्या विरोधात लवकरात लवकर खटला चालवून त्याला शिक्षा करण्याची मागणी केली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी जमावाच्या समोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला आणि जमावाच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शिक्षा देण्याचं आश्वासन दिलंय.

पुण्यातील नसरापूरमध्ये 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केलं. यावेळी नराधम आरोपीला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पुणे लैंगिक आणि हत्या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. तसंच अत्याचाराचं प्रकरण फास्टट्रॅकवर चालवणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

Nasrapur Girl Death : नेमकं काय घडलं?

पुण्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी एक धक्कादायक घटना घडली. एका 65 वर्षीय व्यक्तीने, घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नंतर दगडाने ठेचून तिला निर्घृणपणे संपवलं आणि नंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला. दुपारी चिमुकली न दिसल्यानं तीची शोधाशोध केल्यानंतर चिमुकली गोठ्यात मृत अवस्थेत आढळली. त्यानंतर परिसरातले सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना दिसला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

नराधम आरोपीने वासरू दाखवतो म्हणून हात धरून त्या चिमुकलीला गोठ्यात नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. आजीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आलेल्या या मुलीच्या कुटुंबीयांनी आपल्याच मुली सोबत असं कधी घडेल असा विचारही केला नव्हता. मात्र दुपारी साडेतीन वाजताचे ते सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आणि अख्खं कुटुंब हादरलं. या घटनेनंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत पोलिसांना घेराव घातला.

दरम्यान, या प्रकरणातील नराधमाला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.