Latur News – लातूर विभागाचा बारावीचा निकाल 84.14 टक्के; निकालात मुलींचीच सरशी, नांदेड जिल्ह्याची पिछाडी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. या निकालात लातूर विभागाचा एकूण निकाल ८४.१४ टक्के लागला असून, संपूर्ण महाराष्ट्रात या विभागाचा निकाल सर्वात कमी नोंदवला गेला आहे. विभागाच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. मुलींच्या या यशामुळे लातूर विभागातील मुलीच हुशार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

विभागीय आकडेवारीनुसार, लातूर विभागातून एकूण ४९ हजार ६५२ मुले आणि ४१ हजार ६७४ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी प्रत्यक्षात ४८ हजार ८९१ मुले आणि ४१ हजार मुली अशा एकूण ८९ हजार ८९१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये ३८ हजार ८४६ मुले आणि ३६ हजार ७९५ मुली असे एकूण ७५ हजार ६४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७९.४५ टक्के असून मुलींचे प्रमाण ८९.७४ टक्के इतके राहिले आहे.

जिल्हानिहाय निकालाचा विचार करता, लातूर जिल्ह्याने ८९.८२ टक्क्यांसह विभागात आघाडी घेतली आहे. धाराशिव जिल्ह्याचा निकाल ८८.५९ टक्के लागला आहे, तर नांदेड जिल्ह्याला मात्र ७७.७० टक्क्यांवर समाधान मानावे लागले असून तो विभागात सर्वात पिछाडीवर आहे.

शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९३.१६ टक्के लागला आहे. यामध्ये लातूर जिल्ह्याने ९७.२२ टक्क्यांसह बाजी मारली असून धाराशिवचा निकाल ९६.१८ टक्के तर नांदेडचा निकाल ८८.८२ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ८०.३७ टक्के असून त्यातही लातूर (८५.६३ टक्के) आघाडीवर आहे. कला शाखेचा निकाल ६९.५९ टक्के लागला असून यात नांदेड जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी म्हणजे ६०.११ टक्के इतका आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम (MCVC) आणि टेक्निकल विभागाचे निकाल अनुक्रमे ७५.१५ टक्के आणि ८३.१५ टक्के लागले आहेत.

लातूर जिल्ह्यातील तालुकानिहाय निकालात जळकोट तालुक्याने ९६.४४ टक्क्यांसह उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यापाठोपाठ उदगीर (९१.४९ टक्के), औसा (९१.३२ टक्के) आणि अहमदपूर (९०.०७ टक्के) या तालुक्यांचा क्रमांक लागतो. लातूर तालुक्याचा निकाल ८९.७८ टक्के लागला आहे, तर चाकूर तालुक्याचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८५.९६ टक्के नोंदवला गेला आहे.

गुणवत्तेच्या स्तरावर पाहिल्यास, लातूर विभागातून ४,१७१ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह (Distinction) उत्तीर्ण झाले आहेत. १७,३९८ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली असून ३७,९३२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर १६,०८० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत. विभागाचा निकाल राज्यात सर्वात कमी असला, तरी मुलींची टक्केवारी आणि लातूर-धाराशिव जिल्ह्यांची कामगिरी लक्षणीय ठरली आहे.

Comments are closed.