Jalna News – उसाला पाणी देताना उष्माघात, अल्पभूधारक शेतकर्याचा दुर्दैवी मृत्यू
जालन्यातील अंबड तालुक्यातील लखमापुरी येथे भीषण उष्णतेमुळे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. लखमापुरी येथील अल्पभूधारक शेतकरी विष्णूदादासाहेब गाडे (४५) यांचा उसाला पाणी देत असताना उष्माघाताने मृत्यू झाला.
विष्णू गाडे यांच्या शेतात उसाची फोडणी सुरू होती. ज्या ठिकाणी उसाला माती लावण्याचे काम पूर्ण झाले होते, त्या भागात त्यांनी पाणी चालू केले होते. काल ३० एप्रिल रोजी दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास प्रचंड उष्णतेमुळे त्यांना अचानक घबराट येऊन प्रकृती खालावली. विष्णू गाडे यांनी शेता शेजारी असलेल्या त्यांच्या चुलत भावाच्या मुलाला आवाज दिला व त्याने प्रथम सुखापूरी येथे दवाखान्यात नेले. परंतू डॉक्टरांनी अंबडला जावू द्या, त्यानंतर अंबड येथे नेत असतांना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक अंदाजानुसार उष्माघात हे मृत्यूचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.
विष्णू गाडे हे कुटुंबातील कर्ते पुरुष होते. त्यांच्या पश्चात दोन अल्पवयीन मुले आहेत. एक मुलगा १७ वर्षांचा असून दुसरा १५ वर्षांचा आहे. कुटुंबाचा सर्व आर्थिक आणि सामाजिक भार मयत शेतकर्यावरच होता. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे गाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सध्या परिसरात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढलेला असून शेतकरी उन्हाच्या तीव्र झळा सहन करत शेतात काम करत आहेत. अशा परिस्थितीत शेतकर्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, दुपारच्या तीव्र उन्हात काम टाळावे, तसेच प्रशासनानेही उष्माघाताबाबत जनजागृती व मदतीची उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
Comments are closed.