Yavatmal News – घरफोडी प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद अन् आणखी एक गुन्हा उघड, स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मारेगाव येथील घरफोडी प्रकरणातील फरार आरोपीला अटक करत स्थानिक गुन्हे शाखेने आणखी एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत सुमारे ९.३० लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.

नथ्यु नागु कुरकुटे (वय ३०, रा. मोहदरी, ता. उमरखेड) हा आरोपी मागील गुन्ह्यात फरार होता. पुसद-उमरखेड मार्गावरील कोपरा फाटा परिसरात तो असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. अंगझडती दरम्यान त्याच्याकडून मिळालेल्या दागिन्यांबाबत चौकशी केली असता, मारेगाव येथील आणखी एका घरफोडी गुन्ह्यातील मुद्देमाल त्याच्याकडे असल्याचे उघड झाले. या गुन्ह्यात त्याने साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली.

यापूर्वी २१ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेने २१ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करत मोठा गुन्हा उघडकीस आणला होता. त्या कारवाईत दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांसह इतर आरोपी निष्पन्न झाले होते. या प्रकरणात नथ्यु कुरकुटे हा फरार होता. सदर मुद्देमाल व आरोपी पुढील तपासासाठी मारेगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश चवरे, सपोनि दत्ता पेंडकर, पोउपनि धनराज हाके व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Comments are closed.