Ratnagiri News – प्रकल्पग्रस्तांची विकासाच्या नावाने बोळवण; 18 वर्षांपासून ‘पुरुषोत्तम नगर’ एसटी बसच्या प्रतिक्षेत
सुकोंडी-वाघिवणे धरण प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करून त्यांच्यासाठी ‘पुरुषोत्तम नगर’ नावाने निवासी वसाहत वसवण्यात आली. मात्र, या वसाहतीतील रहिवाशांच्या नशिबी आजही वनवासच असल्याचे चित्र दिसत आहे. वसाहतीत प्रवाशांच्या सोयीसाठी 18 वर्षांपूर्वी एसटी बस निवारा शेड उभारण्यात आले, परंतु आजतागायत येथे एकही एसटी बस आलेली नाही. त्यामुळे शासनाचा निधी वाया गेल्याची टीका होत आहे.
दापोली तालुक्यातील सुकोंडी-वाघिवणे धरण प्रकल्पग्रस्तांसाठी सन २००३ मध्ये पुरुषोत्तम नगर वसाहत तयार करण्यात आली. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना प्रवासाची सुविधा मिळावी, या उद्देशाने प्रशासनाने त्याच वर्षी (२००३ मध्ये) एक पक्के एसटी बस थांबा निवारा शेड बांधले. त्यानंतर २००८ पासून प्रकल्पग्रस्त या वसाहतीत वास्तव्यास आले. मात्र, निवारा शेड बांधल्यापासून गेल्या १८ वर्षांत या थांब्यावर एकदाही एसटी बस आलेली नाही.
शासनाने प्रकल्पग्रस्तांना सोयीसुविधा देण्याचा केवळ नावापुरता प्रयत्न केला असून, अनेक मूलभूत सुविधांपासून हे नागरिक आजही वंचित आहेत. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो किंवा मैलोन्मैल पायपीट करावी लागते. १८ वर्षे उलटूनही बस सेवा सुरू होऊ शकली नसल्याने लोकप्रतिनिधींच्या विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित बस सेवा सुरू करावी, अशी मागणी पुरुषोत्तम नगरमधील रहिवाशांकडून केली जात आहे.
Comments are closed.