अमेरिकेच्या कोणत्याही मूर्खपणाला चोख प्रत्युत्तर देऊ, इराणचा ट्रम्प यांना इशारा
गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाने आता पुन्हा एकदा गंभीर वळण घेतले आहे. अमेरिकेने इराणसोबतच्या नव्या कराराचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. यानंतर इराणच्या लष्कराने अमेरिकेला गंभीर इशारा दिला आहे. अमेरिकेच्या कोणत्याही मूर्खपणाला उत्तर देण्यासाठी आमचे सैन्य सज्ज असल्याचे इराणने म्हटले आहे. यासंदर्भात ‘आज तक’ने वृत्त दिले आहे.
इराणच्या लष्करी मुख्यालयाचे उपप्रमुख मोहम्मद जाफर असदी यांनी अमेरिकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. असदी म्हणाले आहेत की, अमेरिका कोणत्याही कराराबाबत प्रामाणिक नाही. “अमेरिकन अधिकाऱ्यांची विधाने केवळ माध्यमांना डोळ्यासमोर ठेवून केली जातात. तेलाच्या किमतीतील घसरण रोखणे आणि स्वतः निर्माण केलेल्या परिस्थितीतून बाहेर पडणे हाच त्यांचा मुख्य उद्देश असतो,” असा आरोप त्यांनी केला. इराणी सशस्त्र दले पूर्णपणे सतर्क असून कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले आहेत.
दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या नव्या कराराचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. इराण अशा अटी घालत आहे ज्या स्वीकारणे शक्य नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. “इराणला करार करायचा आहे, पण मी त्यावर समाधानी नाही. तिथले नेतृत्व विखुरलेले असून वेगवेगळ्या गटात विभागले गेले आहे,” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
फ्लोरिडा येथील एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प म्हणाले की, इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे मिळवू दिली जाणार नाहीत, कारण ते जगाच्या सुरक्षेसाठी मोठे संकट आहे. ते म्हणाले, “जर आम्ही इराणविरोधात पावले उचलली नसती, तर त्यांच्याकडे अण्वस्त्रे असती आणि इस्रायलसह संपूर्ण मध्य पूर्व आणि युरोप उद्ध्वस्त झाला असता. आम्ही अशा वेड्यांच्या हातात अण्वस्त्रे जाऊ देऊ शकत नाही.”
Comments are closed.