चेन्नईने मुंबईचा बाजार उठवला! रथी-महारथी असलेली मुंबई इंडियन्स आयपीएल 2026 मधून पॅकअप, Points T
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स IPL 2026 : आयपीएल 2026 मधील 44 व्या थरारक सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आपला प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सवर (MI) 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) रंगलेल्या या ‘एल क्लासिको’ सामन्यात चेन्नईने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर मुंबईला मागे टाकले. या विजयासह चेन्नईने प्लेऑफच्या शर्यतीत आपले आव्हान कायम राखले आहे, तर मुंबई इंडियन्सचा यंदाच्या हंगामातील प्रवास आता संपुष्टात आल्याचे दिसत आहे.
विजय 4 आम्हाला! 🦁💛#व्हिसलपोडू #CSKvMI pic.twitter.com/0xTc8Rk64g
— चेन्नई सुपर किंग्स (@ChennaiIPL) 2 मे 2026
नमन धीर पास, बाकी सगळे नापास
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि सात गडी गमावून 159 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून नमन धीरने 37 चेंडूंमध्ये 57 धावा करून सर्वाधिक धावा केल्या. रायन रिकल्टनने 24 चेंडूंमध्ये 37 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 21 धावा, तर कर्णधार हार्दिक पांड्याने 19 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्सकडून अंशुल कंबोजने तीन बळी घेतले. नूर अहमदने दोन बळी, तर जेमी ओव्हरटन आणि रामकृष्ण यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
ऋतुराज गायकवाडचा झंझावात
मुंबई इंडियन्सने दिलेल्या 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, चेन्नई सुपर किंग्सच्या डावाची सुरुवात कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांनी केली. मात्र, संजू सॅमसन मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आणि जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला. संजू 9 चेंडूंमध्ये 11 धावा करून बाद झाला. त्यानंतर, स्फोटक फलंदाजी करणाऱ्या उर्विल पटेलला अल्लाह गझनफरने बाद केले. उर्विल पटेलने दोन चौकार आणि दोन षटकारांसह 12 चेंडूंमध्ये 24 धावा केल्या. यानंतर, कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि कार्तिक शर्मा यांनी सामना जिंकून देणारी खेळी करत चेन्नई सुपर किंग्सला 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवून दिला.
मुंबई इंडियन्सवर चेन्नईचे वर्चस्व; प्लेऑफचे समीकरण
विशेष म्हणजे, या हंगामात चेन्नईने मुंबईला दुसऱ्यांदा पराभूत केले आहे. यापूर्वी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यातही चेन्नईने मुंबईवर मात केली होती. त्यामुळे या हंगामात चेन्नईने मुंबईविरुद्ध ‘क्लीन स्वीप’ दिला आहे. या विजयामुळे चेन्नईचे 8 गुण झाले असून ते गुणतालिकेत 6व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. उर्वरित सामन्यांमध्ये विजय मिळवून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या चेन्नईच्या आशा आता जिवंत आहेत. दुसरीकडे, 9 सामन्यांत 7 पराभव स्वीकारलेल्या मुंबई इंडियन्ससाठी बाद फेरीचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.