IPL 2026- चेन्नई पुढे मुंबई चितपट; आयपीएलचे आव्हान जवळपास पूर्ण, ऋतुराजची दमदार कामगिरी
मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएल मधील दोन्ही सामन्यांत चेन्नई सुपर किंग्जने पराभवाची धूळ चारत चितपट केले. मुंबईसाठी हा सामना महत्त्वाचा होता. पण नमन धीरचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे मुंबईला 159 धावांवर समाधान मानावे लागले. कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने मुंबईवर 8 विकेट्स राखून सोपा विजय साकारला. आता मुंबईचे 5 सामने शिल्लक आहेत. पण हे पाच सामने जिंकूनही मुंबईचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे मुंबईचे या मोसमातील आव्हान जवळपास संपुष्टात आल्याचे दिसत आहे. पण चेन्नईचा संघ विजयासह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
मुंबईच्या 160 धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसन 11 धावांवर बाद झाला. पण त्यानंतर ऋतुराजने कर्णधाराला साजेशी खेळी साकारत अर्धशतक झळकावले आणि संघाला सहज विजय मिळवून दिला. ऋतुराजने यावेळी 48 चेंडूंत नाबाद 67 धावांची खेळी साकारली. ऋतुराजला यावेळी कार्तिक शर्माने नाबाद 54 धावा करत सुयोग्य साथ दिली.
मुंबई इंडियन्सचे फलंदाज एका बाजूने धारातीर्थी पडत असताना नमन धीरने संघाला सावरले. नमनच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाला 159 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. रोहित शर्माला या सामन्यातही संधी देण्यात आली नाही. पण संघातील सूर्यकुमार यादव, कर्णधार हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा हे तिघेही अपयशी ठरले.
या सामन्यात मुंबई इंडियन्सची चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सुरुवात निराशाजनक झाली. मुंबईला दुसऱयाच षटकात विल जॅक्सच्या (1) रूपात मोठा धक्का बसला. रायन रिक्लेटनने 24 चेंडूंत 37 धावा केल्या. पण नमन धीर मात्र यावेळी खेळपट्टीवर टिकून होता. त्यानंतर नमनला काही काळ साथ मिळाली ती सूर्यकुमार यादवची. सूर्या या सामन्यात 21 धावांवर बाद झाला. सूर्यानंतर फलंदाजीला आलेल्या तिलक वर्माला 5 धावा करता आल्या.
मुंबईची 4 बाद 109 अवस्था झाली होती. नमनला त्यानंतर साथ मिळाली ती कर्णधार हार्दिक पंड्याची. नमनने आक्रमक फटकेबाजी केल्यामुळे अर्धशतक साकारले. पण नमनला अर्धशतकानंतर जास्त काळ खेळपट्टीवर उभे राहता आले नाही. नमनने यावेळी 37 चेंडूंत 4 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 57 धावा केल्या.
नमन बाद झाल्यावर मुंबईची धावसंख्या मंदावली. हार्दिक पंड्याने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणे गरजेचे होते, पण त्याच्याकडून धडाकेबाज फलंदाजी पाहायला मिळाली नाही. हार्दिक पंड्याने यावेळी 18 धावा केल्या, पण त्यासाठी त्याला 23 चेंडू खर्च करावे लागले.
Comments are closed.