Amit thackeray on Pune Nasarapur Girl Case : नसरापूर घटनेवरुन अमित ठाकरेंचा संताप

Amit thackeray on Pune Nasarapur Girl Case : नसरापूर घटनेवरुन अमित ठाकरेंचा संताप

मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. नसरापूरमध्ये त्या चिमुरडीसोबत जे घडलं, ते ऐकून मन सुन्न झालंय आणि डोकं रागाने भणभणतय. मुट्टीसाठी आजीकडे आलेल्या 3-4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली जाते? ही कोणती विकृती आपण आपल्या समाजात आणि राज्यात पोसतोय? महाराष्ट्रात आज माता-भगिनी सोडाच, पण लहान बाळंही सुरक्षित राहिलेली नाहीत, ही आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.गेल्या काही महिन्यांतील घटनांची मालिका पाहिली तर अंगावर काटा येतो. नसरापूर, बदलापूर, ठाणे, पुणे, चाकण, महाळुंगे… अशा किती जागांची आणि किती निष्पापांची नावं आपण घ्यायची? प्रत्येक वेळी नवी घटना घडते, आपण दोन दिवस संताप व्यक्त करतो आणि तिसऱ्या दिवशी सगळं विसरून जातो. म्हणूनच पोर्शे अपघातात निबंध लिहून सुटका होते आणि नेस्कोमध्ये ओव्हरडोसमुळे जीव जाऊनही कोणतीच ठोस कारवाई होत नाही. ही व्यवस्थेची लाचारी नाही तर काय आहे?माझा सत्तेत वसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं प्रशासन नक्की कोणासाठी काम करतंय? गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही, कारण त्यांना माहितीये की कोणत्या ना कोणत्या मंत्र्याचा वरदहस्त त्यांच्या पाठीशी आहे.’शक्ती कायद्याच्या’ गप्पा खूप झाल्या, पण तो कायदा प्रत्यक्षात राबवण्याचं धाडस हे सरकार का दाखवत नाहीये? केवळ कागदावर कायदे करून किंवा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ‘लाडकी बहीण योजना जाहीर करुन बहिणी सुरक्षित होत नसतात; त्यांच्या सुरक्षिततेसाठी गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा दरारा निर्माण करावा लागतो. आज परिस्थिती इतकी भीषण आहे की, उद्या आपली मुलं घराबाहेर सुरक्षित असतील याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. सत्तेत बसलेले लोक 10 दिवसांनी जुन्या घटना विसरून नवीन जाहिरातींमध्ये दंग होतात, पण पीडितांचे काय? माझं सरकारला पुन्हा सांगणं आहे, पोलिसांना फक्त 24 तासांचा ‘फ्री हॅण्ड’ द्या! आमचे पोलीस सक्षम आहेत, पण त्यांचे हात राजकीय हितसंबंधांनी बांधलेले आहेत. लोकशाहीत आम्ही प्रत्येक गोष्ट सहन करतोय, पण हे सर्व सहन करण्याच्या पलीकडचे आहे. मी इथे एक नेता म्हणून नाही, तर एक सामान्य ‘माणूस’ आणि एक बाप म्हणून जाब विचारतोय… आपल्या महाराष्ट्राला आपण कोणत्या थरावर नेऊन ठेवणार आहोत?

Comments are closed.