धारावीकर आज अदानी कंपनीवर देणार धडक

धारावी पुनर्विकास प्रकल्पात सर्व पात्र-अपात्र झोपडीवासीयांना धारावीमध्येच प्रत्येकी 500 चौरस फुटांचे घर मिळालेच पाहिजे, तसे लेखी आश्वासन सरकार आणि कंपनीने द्यावे अशी मागणी करत उद्या हजारो धारावीकर रणरणत्या उन्हात मोर्चा काढून माटुंगा येथील अदानी कंपनीवर धडक देणार आहेत. ‘धारावी बचाव आंदोलना’च्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या जनआक्रोश मोर्चामध्ये शिवसेनेसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, विविध संघटना आणि नागरिक सहभागी होणार आहेत.

धारावीचा पुनर्विकास अदानी समूहाच्या मे. नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत करण्यात येणार आहे, मात्र पुनर्विकासात धारावीकरांना नेमके काय मिळणार याबाबत राज्य सरकार किंवा अदानी कंपनीकडून कोणतेही लेखी आश्वासन अद्याप मिळालेले नाही. तसेच पुनर्विकास प्रकल्पाचे कोणतेही सादरीकरण करण्यात आलेले नाही. यामुळे धारावीकरांमध्ये संभ्रमाबरोबरच असंतोषही आहे. त्याचा उद्रेक उद्याच्या मोर्चाद्वारे होणार आहे.

असा निघणार मोर्चा

धारावीमधील कुंभारवाडा येथून सकाळी 11 वाजता हा मोर्चा निघणार आहे. अदानी कंपनी आणि राज्य सरकारचा निषेध करणारे फलक घेऊन धारावीकर या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी जोरदार घोषणाही देण्यात येणार आहेत.

या मोर्चात शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, आमदार ज्योती गायकवाड, ‘धारावी बचाव आंदोलना’चे नेते-माजी आमदार बाबुराव माने, शिवसेना नगरसेवक जोसेफ कोळी, टी. एम. जगदीश, नगरसेविका अर्चना शिंदे, हर्षला मोरे, काँग्रेस नगरसेविका आशा काळे, नगरसेवक बब्बू खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे उलेश गजाकोश, कम्युनिस्ट पक्षाचे मिलिंद रानडे, नसरूल हक, माजी नगरसेवक प्रकाश नकाशे, सपाचे राहुल गायकवाड, असफाक खान, बिजनेस असोसिएशनचे समीर मंगरू, अन्सार शेख, मनसेचे आरिफ शेख, ‘आप’चे राफेल पॉल, बसपाचे शामलाल जैस्वार, कुंचीकोरवे समाजाचे ज्येष्ठ नेते जगन भोसले यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होणार आहेत.

कोळी बांधवांना पुनर्विकास प्रकल्पातून वगळा – अनिल देसाई

कोळी-आगरी बांधव हे मुंबईचे भूमिपुत्र आहेत. धारावी अस्तित्वात येण्यापूर्वीपासून कोळी बांधवांचे धारावीत वास्तव्य आहे. त्यामुळे त्यांचा धारावी पुनर्विकास प्रकल्पात समावेश न करता स्वतंत्रपणे पुनर्विकास करावा अशी त्यांची मागणी रास्त असल्याचे शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांनी म्हटले आहे. तर सर्व पात्र-अपात्रांना धारावीतच घरे देऊ असे लेखी आश्वासन सरकार आणि अदानी कंपनीने धारावीवासीयांना द्यावे, असे शिवसेना आमदार महेश सावंत यांनी म्हटले आहे.

Comments are closed.