चोवीस तास वीज गुल, काशीदमध्ये ट्रान्सफॉर्मर जळाला; पर्यटक घामाघुम

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चाळिशीला पोहोचलेल्या पाऱ्याने अंगाची लाहीलाही झाली असताना काशीदमधील ट्रान्सफॉर्मर जळाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सलग सुट्ट्या असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक काशीद समुद्रकिनारी दाखल झाले होते. मात्र गेल्या २४ तासांपासून शहरात वीज गुल झाल्याने पर्यटक अक्षरशः घामाघुम झाले. अनेक पर्यटकांनी हॉटेलमधील रूम सोडून आपले घर गाठले. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे नुकसान झाले.

मुरुड तालुक्यामधील काशीद ग्रामपंचायत ही महत्त्वाची ग्रामपंचायत असून या ठिकाणी दोन हजारांहून अधिक लोकवस्ती आहे. शनिवार, रविवार सलग सुट्टया आल्याने पर्यटक काशीद येथे आले होते. मात्र शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास काशीद शहराला वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागली आणि संपूर्ण शहराची बत्ती गुल झाली. हॉटेलमधील जनरेटर काही तास सुरू होते. मात्र जनरेटरही बंद झाल्याने पर्यटकांचा घामटा निघाला. अखेर पर्यटकांनी हॉटेल सोडून घराकडे जाणे पसंत केले.

स्थानिकांचा संताप
महावितरणचे शाखा अभियंता इरफान खान यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरच वीज येईल असे सांगितले. २४ तास उलटून गेले तरी वीज न आल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला. महावितरणचे अधिकारी सुस्तावले आहेत. पर्यायी योजना त्यांच्याकडे नाही. वीज साहित्याचा अपुरा पुरवठा असल्याने एखादा पार्ट गेला तर त्यांना गोरेगाव येथे धाव घ्यावी लागते. ट्रान्सफॉर्मर जळाल्याची ही दुसरी घटना आहे. वीज नसल्याने पर्यटक रूम सोडून जात असल्याने आमचे भरपूर नुकसान झाल्याचे हॉटेल व्यावसायिक सुनील दिवेकर यांनी सांगितले.

Comments are closed.