परदेशी निधी बंद झाल्याने सिल्हर वुड्स स्कूल बंद होणार, खर्डीतील ८८ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकास्थित रुरल गोस्पेल अँड मेडिकल मिशन ऑफ इंडिया या संस्थेची शहापूर तालुक्यातील खर्डी येथील सिल्हर वुड्स इंग्लिश मीडियम स्कूल जून महिन्यापासून बंद होणार आहे. त्यामुळे ८८ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे. रुरल गोस्पेल अँड मेडिकल मिशनने निधी देणे बंद केल्याने स्थानिक व्यवस्थापनाने आगामी शैक्षणिक वर्षापासून शाळा बंद करण्याचा निर्णय संस्थेने पालक सभेमध्ये जाहीर केला.

अमेरिकास्थित रुरल गोस्पेल अँड मेडिकल मिशन ऑफ इंडिया या संस्थेची खर्डी येथे २००४ सालापासून सिल्हर वुड्स इंग्लिश मीडियम स्कूल सुरू आहे. या ठिकाणी प्री-प्रायमरी ४२ व प्रायमरी ४६ असे ८८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र आता अचानक व्यवस्थापन समितीने जूनपासून शाळा बंद होणार असल्याचे जाहीर केल्याने पालक व विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. परदेशी निधी थांबल्याने शाळेतील आठ शिक्षक व तीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतनही मिळत नाही. मुलांचे पुढील शिक्षण कुठे व कसे घ्यावे, असा प्रश्न पालकांना पडला आहे.

“शाळा पूर्णपणे बंद न करता टप्प्याटप्प्याने बंद करणार असल्याचे पत्र व्यवस्थापन समितीने दिले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय होऊ देणार नाही असे संस्थेने दिले आहे. त्यामुळे एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लवकरच व्यवस्थापन समिती व पालकांची बैठक घेऊन योग्य मार्ग काढला जाणार आहे.” – हिराजी वेंगडे, गटशिक्षणाधिकारी, शहापूर

Comments are closed.