खारेगावात पुन्हा ‘वसुली’ सुरु, टोलनाक्याला सरकारची मंजुरी
मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाक्यावर पुन्हा ‘वसुली’ करण्याची तयारी सुरु झाली आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर टोलनाका सुरु करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली असल्याने वाहनचालकांच्या खिशावर डल्ला मारण्यात येणार आहे. दरम्यान, वाहनचालकांनी खारेगाव टोलनाक्याचा कडाडून विरोध केला असून पुन्हा टोलनाका संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव येथे असलेला टोलनाका २०१७ मध्ये बंद करण्यात आला होता. आता बंद करण्यात आलेला टोलनाका नव्या रस्ते प्रकल्पामुळे पुन्हा उभारला जात आहे. समुद्री महामार्गाशी जोडणाऱ्या आमने ते ठाणे या दहा पदरी मार्गिकेच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईकडे जाणारा प्रवास वेगवान होणार असला तरी ठाणे, कल्याण, भिवंडी, नवी मुंबई आणि मुंबईकडे येणाऱ्या वाहनचालकांना पुन्हा टोलचा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.
ही तर लुटच टोलनाका उभारणीच्या या निर्णयाला मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विरोध केला आहे. या टोलनाक्यावर ठाणेकरांना टोलमुक्ती न दिल्यास हा टोलनाका बंद पाडू असा इशारा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला आहे. तर काहीही झाले तरी टोलनाका उभारू देणार नाही, टोलच्या नावाखाली सरकार सामान्यांची लूटच करत आहे, असा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला.
खर्चवसुलीसाठी वाहनचालकांच्या खिशाला कात्री
माजिवडा ते वडपे या २३ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. समुद्री महामार्ग भिवंडी येथून या मार्गाशी जोडला गेला आहे. भविष्यात ठाणे कोस्टल रोडही या मार्गाशी जोडला जाणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होणार असून प्रवास वेगवान होणार आहे. दरम्यान, प्रकल्पाचा खर्च वसूल करण्यासाठी वाहनचालकांच्या खिशाला कात्री लावण्याचा चंग सरकारने बांधला आहे.
Comments are closed.