तानसा अभयारण्यात उदमांजर, चौसिंगा, हळद्या, भुंगराज, सातभाई; वनखात्याने केली पक्षी-प्राण्यांची प्रगणना
तानसा वन्यजीव अभयारण्यात वनविभागाने पक्षी आणि प्राण्यांची प्रगणना केली आहे. या गणनेतून जैवविविधता समोर आली असून या अभयारण्यात उदमांजर, चौसिंगा, हळद्या, भुंगराज, सातभाई यासारख्या अनेक पक्षी आणि प्राण्यांचे दर्शन झाले. तसेच पाणवठ्यावर आलेले भेकर, साळिंदर, रानडुक्कर, मुंगूस, ससा, जंगली मांजर, उडणारी खार, कोल्हे अशा विविध प्राण्यांचे अस्तित्व जाणवले आहे. दरम्यान, यामुळे तानसा अभयारण्यात पर्यटकांची संख्या वाढणार असल्याचा विश्वास वनविभागाने व्यक्त केला.
बुध्दीगिरीच्या चांदण्यांत तानसा अभयारण्याच्या वनपरिक्षेत्रातील साखरडोली, केळवेचे पाणी, बोरोड्याचे पाणी, अर्धे पगार तलाव, वेडवडाळ वनमोरी नाला आदी पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांचे निरीक्षण करण्यात आले. पक्षी-प्राण्यांचे ठसे, त्यांच्या हालचाली आणि आवाजाद्वारे त्यांचे अस्तित्व नोंद करण्यात आली. तसेच धामण, दिवड, घोणस यासारखे सर्पदेखील निदर्शनास आले. रात्रीच्या गडद शांततेत वनबुड, जंगली पिंगळा, गव्हाणी घुबड दिसले.
येऊरमध्ये वन्यजीवांची संख्या घटली
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत येणाऱ्या येऊर वनक्षेत्रांमध्ये वन्यजीवांची संख्या घटली असल्याचे समोर आले. ही जैवविविधतेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. या विशेष गणनेत एकूण ३४ वन्यजीवांची नोंद झाली असून, यामध्ये एका बिबट्याचा समावेश आहे. मागील वर्षी ही संख्या ६१ इतकी होती. त्यामध्ये हनुमान लंगूर, रानडुक्कर, वटवाघूळ, शेकरू, माकड, मुंगूस, सांबर आणि दुर्मिळ उदमांजर यांचा समावेश असल्याचे सहाय्यक वनसंरक्षक मयूर सुर्वे यांनी सांगितले.
तर सकाळच्या कोवळ्या उन्हात ब्लॅकबर्ड, नीलिमा, नीलमणी, सह्याद्रीचा सूर्यपक्षी, निळा सूर्यपक्षी, फुलटोचा, पावशा, मोरशी, तुरेवाला सर्पगरुड, मोर, घार, कोतवाल, सुतारपक्षी, मराठा सुतार असे विविधरंगी पक्षी आढळले.
Comments are closed.