कसाऱ्याला ट्रॅफिककोंडीचे ग्रहण, भररस्त्यात काळ्या-पिवळ्या टॅक्सींची रांग; चालणेही झाले मुश्कील
कसारा रेल्वे स्थानकाबाहेर भाडे भरण्यासाठी काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि जीप कसाही आडवा तिडवा उभ्या केल्या जातात. त्यामुळे सिद्धेश्वर मंदिर परिसरात वाहतूककोंडी नित्याची झाल्याने नागरिकांना येथून चालणेही मुश्कील झाले आहे. या ट्रॅफिककोंडीच्या ग्रहणातून कधी सुटका होणार, असा सवाल कसारावासीयांनी विचारला आहे. बेफिकीर चालकांवर पोलीस काहीही कारवाई करत नसल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
कसारा रेल्वे स्थानकाबाहेर नाशिकसह शिर्डी, घोटी, इगतपुरी, राजूर, अकोले अशा विविध भागांत जाण्यासाठी खासगी वाहने, बस उभ्या असतात. त्यामुळे वाहतूककोंडी होते. वाहतूककोंडीवर कायमचा तोडगा काढण्यासाठी कसारा रेल्वे स्थानकाबाहेर रेल्वे प्रशासनाने पार्किंगची व्यवस्था केली. १२ तासांसाठी दुचाकी २० रुपये तर चारचाकी ५० रुपये असे भाडे आकारण्यात आले. काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि जीपचालकांनी एक आठवडाभर आपली वाहने त्याठिकाणी पार्क केली. त्यानंतर टॅक्सी युनियनने पार्किंगचे भाडे जास्त असल्याचे कारण पुढे करत रस्त्यावरच आपली गाड्या पार्क करून प्रवासी भरण्यास सुरुवात केली. यामुळे सिद्धेश्वर मंदिरापासून अर्धा किलोमीटरपर्यंत वाहतूककोंडीचा विळखा पडत आहे.
“सिद्धेश्वर मंदिर परिसरात टॅक्सींसह अन्य वाहनांकडून मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी केली जाते. पार्किंग चालक आणि टॅक्सी वाहतूक संघटना यांच्या वादामुळे वाहतूककोंडीचा त्रास नागरिकांना होत असल्यामुळे आमच्याकडून कारवाईचे सत्र सुरुच आहे.” – सुरेश गवित, पोलीस निरीक्षक, कसारा
Comments are closed.