SIR च्या माध्यमातून 90 लाख मतदारांना वगळून भाजपने विजयाचा मार्ग मोकळा केलेला, रोहित पवार यांची टीका
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पश्चिम बंगाल व तमिळनाडूतील निकालांवर प्रतिक्रिया देताना भाजपवर जोरदार टीका केली आहे. ”भाजपने SIR च्या माध्यमातून 90 लाख मतदारांना वगळून विजयाचा मार्ग मोकळा केला होता’, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. X वर एक पोस्ट शेअर करत त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. सोबतच त्यांनी ‘पश्चिम बंगालमध्ये जर सत्तेच्या विरोधात लाट होती व त्याचा फटका सत्ताधारी पक्षाला बसला असेल, तर असाच फटका महाराष्ट्र व देशातील सत्ताधाऱ्यांना देखील बसू शकतो’ अशा शब्दात भाजपला फटकारले आहे.
”तमिळनाडूमध्ये INDIA आघाडीतील DMK तर पश्चिम बंगालमध्ये TMC ची सत्ता येईल, अशी अपेक्षा होती; पण या दोन्ही राज्यांना सत्ताविरोधी लाटेचा फटका बसल्याचं दिसतंय. त्यातच गृहमंत्री अमित शाह साहेब यांनी निवडणुकीसाठी प. बंगालमध्ये १५ दिवस ठाण मांडलं होतं आणि SIR च्या माध्यमातून ९० लाख मतदारांना वगळून एकप्रकारे विजयाचा मार्गही मोकळा केला होता. यामुळं महाराष्ट्रासह केंद्रातील सत्ताधाऱ्यांना नक्कीच आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील, पण त्यांनी हे विसरु नये की, जर आज देशात आणि महाराष्ट्रात निवडणूक झाली तर या पक्षाविरोधातही तेवढीच anti incumbency असल्याने हाच निकष लावून जनता त्यांनाही सत्तेबाहेर हाकलल्याशिवाय राहणार नाही”, असा टोला त्यांनी सत्ताधारी भाजपला लगावला.
”निवडणुकीत विजय होताच पश्चिम बंगालमध्ये भाजपाने TMC च्या कार्यालयाची तोडफोड करुन यापुढील काळात आपण कसा कारभार करणार, याचाच एक नमुना दाखवून दिला…! अजून संपूर्ण निकालही जाहीर झाले नाही तोच भाजपाने केलेल्या या राड्यामुळं पश्चिम बंगालमधील जनतेला भविष्यात आणखी काय काय बघावं आणि भोगावं लागेल, हे देव जाणं. या तोडफोडीच्या कृत्याचा तीव्र निषेध”, अशी पोस्ट शेअर करत त्यांनी पश्चिम बंगालच्या भविष्यावर चिंता देखील व्यक्त केली.
Comments are closed.