भोपाळमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; सासरच्यांवर हत्येचा आरोप, पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ
निलंगा तालुक्यातील तुपडी येथील 26 वर्षीय विवाहितेचा भोपाळ येथे संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कल्पना सतीश कसबे असे मृत महिलेचे नाव असून, सासरच्या मंडळींनी कल्पनाची हत्या केल्याचा गंभीर आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. घटनेची माहिती उशिरा देण्यात आल्याचाही आरोप करण्यात येत आहे.
कल्पनाचा मृतदेह भोपाळहून लातूर जिल्ह्यात आणण्यात आला आहे. चाकूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नळेगाव आउट पोस्ट येथे नातेवाईक मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असून अंगावर मारहाणीच्या खुणा दिसत असल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.
जोपर्यंत आरोपी पती आणि सासरच्यांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. तसेच पोलिसांकडून योग्य ती कारवाई होत नसल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला आहे.
तुपडी येथील कल्पना हिचा विवाह चाकूर तालुक्यातील महाळगरा येथील सतीश कसबे याच्याशी झाला होता. सतीश कसबे हा सध्या भोपाळ येथे नोकरीसाठी वास्तव्यास आहे. विवाहानंतर काही काळ सर्व काही सुरळीत असले तरी, मागील काही दिवसांपासून पती, सासू आणि सासरे यांनी कल्पनावर मानसिक तसेच शारीरिक छळ केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. कल्पना मृत्यूमुळे तिची दोन्ही मुले पोरकी झाली आहेत.
गुन्हा नोंदवण्यावरून पोलिसांत टोलवाटोलवी सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. चाकूर पोलिसांकडून मृत महिलेचे माहेर निलंगा तालुक्यात असल्याने तक्रार निलंगा पोलीस ठाण्यात द्यावी असे सांगितले जात आहे. तर निलंगा पोलिसांनी हे प्रकरण चाकूर पोलिसांकडे पाठविल्याचे समजते. यामुळे नातेवाईकांमध्ये संभ्रम आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदरील घटना भोपाळमध्ये चार दिवसापूर्वी घडली असताना तक्रार तेथेच का दाखल करण्यात आली नाही? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या सर्व प्रशासकीय टोलवाटोलवीत मृतदेह दीर्घकाळ ताब्यात न घेतल्याने त्याची विटंबना होत असल्याची भावना नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
या घटनेमुळे नळेगाव आऊट पोस्ट परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भोपाळमध्येच मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्याचे पोलीस व तिचा पती सांगत आहे. मात्र माहेरचे नातेवाईक कल्पनाच्या शरीरावर मारहाण केल्याच्या खूणा आहेत, त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत आहेत. पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
Comments are closed.