रत्नागिरी न्यूज – दापोली तालुक्यातील साखलोली येथे भीषण आग लागली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दापोली तालुक्यातील साखळोली गावात रविवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी घटना घडली. गावातील रहिवासी जगदीश मोतीराम तलाठी यांच्या घर व दुकानाला अचानक भीषण आग लागली. आगीचे स्वरूप इतके तीव्र होते की काही वेळातच संपूर्ण घर आणि दुकान जळून खाक झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रात्री उशिराची वेळ असल्यामुळे आग लागल्याचे सुरुवातीला कुणाच्या लक्षात आले नाही. मात्र, आगीच्या ज्वाळा वाढताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. या आगीत घरातील सर्व साहित्य, तसेच दुकानातील माल पूर्णपणे जळून नष्ट झाला.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासनाने घटनास्थळी भेट दिली असून पंचनामा करण्यात येत आहे. तसेच नुकसानग्रस्त कुटुंबाला शासकीय मदत मिळावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे साखरोळी गावात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात शोककळा पसरली आहे.

आगीची माहिती मिळताच खेड नगरपरिषद अग्निशमन विभाग तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. फायरमन दीपक देवळेकर, श्याम देवळेकर, सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणय रसाळ, सुरज शिगवण तसेच वाहन चालक गजानन जाधव यांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. तसेच मदतीसाठी दापोली नगरपंचायत अग्निशमन विभाग येथील फायरमन प्रशांत विचारे, नितीन इंदुलकर, मुकादम, संदीप डिंगणकर आणि वाहन चालक अमित रेमजे यांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

या घटनेत घरामध्ये असलेले दोन भरलेले व दोन रिकामे असे एकूण चार गॅस सिलेंडर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. त्यामुळे संभाव्य मोठा स्फोट टळला. घटनास्थळी दापोली पोलीस ठाणे येथील पोलीस प्रकाश मोरे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. सकाळी 10.15 वाजेपर्यंत आग पूर्णपणे विझवण्यात आली. या आगीत घरातील किराणा दुकान पूर्णतः नष्ट झाले असले तरी शेजारील पिठाची चक्की वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Comments are closed.