कलिना संकुलातील आंदोलनांवर बंदी आणा विद्यापीठाची याचिका, धोरण आखण्याची मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कलिना संकुल व येथील 500 मीटरच्या परिसरात होणारी आंदोलने, मोर्चे व संप यांच्यावर बंदी आणा. यासाठी राज्य शासनाने ठोस धोरण आखावे, अशी मागणी करणारी याचिका मुंबई विद्यापीठाने उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी, येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी, तसेच येथील अध्ययन शांततेत व्हावे याकरिता या परिसरासाठी कठोर नियमावली करणे आवश्यक आहे. जेणेकरून येथे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, असेही विद्यापीठाने याचिकेत नमूद केले आहे. अॅड. युवराज नरवणकर यांच्या मार्फत ही याचिका दाखल झाली आहे.

नियमाचे पालन होत नाही

कलिना संकुलात आंदोलन करायचे असल्यास आधी प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल, असे परिपत्रक विद्यापीठाने 2024 मध्ये जारी केले आहे. तरीही येथे विना परवानगी आंदोलने होतात. पोलिसांत याची तक्रार करण्यात आली. यासाठी ठोस नियम करण्याची विनंती करण्यात आली. मात्र याबाबत अद्याप काहीही ठोस पावले उचलली गेली नाहीत, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

प्रवेश रोखला जातो

आंदोलनकर्ते कलिना संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ ठाण मांडून असतात. याने दैनंदिन कामाकाजावर परिणाम होतो. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना वेळेवर प्रवेश मिळत नाही. परीक्षा व क्लासेस वेळेत होत नाहीत. त्यामुळे या परिसरात निर्बंध आणणे आवश्यक आहे, असे विद्यापीठाचे म्हणणे आहे.

पोलीस बंदोबस्त द्या

कलिना परिसरात कायमस्वरूपी पोलिसांची फौज तैनात करा, जेणेकरून येथे आंदोलने व मोर्चे होणार नाहीत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशीही मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

Comments are closed.