दिल्लीतील आगीत ९ जणांचा मृत्यू

एसी स्फोटामुळे चार मजली इमारतीला आग : 15 जणांना वाचवले

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीतील शाहदरा येथील विवेक विहारमधील चार मजली इमारतीला रविवारी पहाटे भीषण आग लागली. या दुर्घटनेत नऊ जणांना प्राण गमवावे लागले. मृतांमध्ये चार पुरुष, चार महिला आणि एका दीड वर्षीय मुलाचा समावेश आहे. सुरुवातीला ही दुर्घटना शॉर्ट सर्किटमुळे घडल्याची चर्चा होती. मात्र, स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार एसीच्या स्फोटानंतर आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप अधिकाऱ्यांकडून निश्चित झालेले नसले तरी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

दिल्लीच्या विवेक विहार परिसरातील एका बहुमजली इमारतीत एसीचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. चार मजली इमारतीला लागलेल्या या आगीत अनेकांचा बळी गेला. उकाड्यापासून दिलासा देणाऱ्या एसीमुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली. आगीची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाने मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दिल्ली अग्निशमन सेवेनुसार, त्यांना पहाटे 3:47 च्या सुमारास आगीची माहिती मिळाली. चार तासांच्या प्रयत्नांनंतर सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. इमारतीत अडकलेल्या 10 ते 15 जणांना वाचवण्यात आले, ज्यात दोन जखमींचा समावेश आहे. अग्निशमन दलाने केलेल्या अथक प्रयत्नांती मृतदेह इमारतीच्या वेगवेगळ्या मजल्यांवरून बाहेर काढण्यात आले. काही मृतदेह इतके जळाले होते की फक्त सांगाडे शिल्लक राहिले होते, असे स्थानिक नगरसेवक पंकज लुथरा यांनी सांगितले.

मृत्यू पावलेल्या नऊ जणांची नावे समोर आली आहेत, परंतु ओळख पटवणे कठीण आहे. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून एक, दुसऱ्या मजल्यावरून पाच आणि जिन्यातील पायऱ्यांवर तीन मृतदेह सापडले.डीएनए चाचणीनंतरच मृतांची ओळख पटवली जाणार आहे. दुसऱ्या मजल्यावर मृत झालेल्यांमध्ये अरविंद जैन (60), त्यांची पत्नी अनिता जैन (58), मुलगा निशांत जैन (35), सून आंचल जैन (33) आणि दीड वर्षांचा नातू आकाश जैन यांचा समावेश आहे. तिसऱ्या मजल्यावर नितीन जैन (50), त्यांची पत्नी शैले जैन (48) आणि मुलगा सम्यक जैन (25) यांचे मृतदेह आढळले. शिखा जैन (45) पहिल्या मजल्यावर मृतावस्थेत आढळल्या, तर त्यांचे पती नवीन जैन (48) जखमी झाले.

अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न

चार मजली इमारतीत प्रत्येक मजल्यावर दोन 4बीएचके फ्लॅट आहेत. इमारतीच्या मागील भागात आग लागल्याने तिथेच बहुतेक मृत्यू झाले. सहा फ्लॅटमधील साहित्य जळून खाक झाले. डीएफएसच्या म्हणण्यानुसार, खिडक्या आणि बाल्कनींना ग्रील्स आणि लोखंडी सळ्या लावल्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला. तरीही, अंदाजे 15 जणांना वाचवण्यात आले. त्यापैकी एक जण अंदाजे 30 टक्के भाजला असून त्याला उपचारासाठी गुरु तेग बहादूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बहुतेक मृतदेह इमारतीच्या मागील भागात आढळल्याचे दिल्ली अग्निशमन सेवेचे अधिकारी मुकेश वर्मा यांनी सांगितले.

Comments are closed.