पश्चिम बंगाल, आसाम भगवा!

‘विजय’पथावर, केरळम् काँग्रेसचा तारणहार, तर पुद्दुचेरीत पुन्हा रालोआचेच सरकार

► वृत्तसंस्था

नवी दिल्ली

चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या पश्चिम बंगाल या राज्यात जणू भगवी क्रांती घडली आहे. या राज्यात भारतीय जनता पक्षाने जागांचे द्विशतक झळकवून अतिप्रचंड विजय प्राप्त केला आहे. तर तामिळनाडूमध्ये चित्रपट अभिनेता थलपती विजय याच्या टीव्हीके या पक्षाने प्रस्थापितांचा धुव्वा उडवत नव्या कालखंडाचा प्रारंभ केला आहे. आसाममध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडेने विजयाची हॅटट्रिक केली केली आहे. तर केरळने काँग्रेसचा ‘हात’ धरला आहे. पुद्दुचेरीतील मतदारांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच पुन्हा कौल दिला आहे.

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष 293 पैकी 205 जागा मिळवत प्रथमच या राज्याची सत्ता आपल्या हाती घेण्यास सज्ज झाला आहे. विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस या पक्षाची पुरती वाताहात झाली असून त्या पक्षाला केवळ 82 जागांवर समाधान मानावे लागले. मागच्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपल्या जागांमध्ये 128 ने वाढ केली, तर तृणमूल काँग्रेसच्या जागा 132 ने घटल्या आहेत. या राज्यातील हे गेल्या 75 वर्षांमधील केवळ तिसरे सत्तांतर आहे. ममता बॅनर्जी यांनी जीवाच्या आकांताने ‘सखोल मतदारसूची पुनर्सर्वेक्षणा’ला (एसआयआर) केलेला विरोध, त्यांनी जवळपास मतगणनेच्या दिवसापर्यंत केलेला न्यायालयीन अट्टाहास आणि निवडणूक काळात घडलेला न्यायाधीशांना कोंडण्याचा प्रकार यामुळे ही निवडणूक देशभरात प्रचंड गाजली होती. त्यामुळे साऱ्या देशाचा उत्कंठा होती.

तामिळनाडूत ‘विजय’रथ

चित्रपट अभिनेता थलपती विजय याच्या टीव्हीके या पक्षाने आपल्या प्रथम प्रयत्नात तामिळनाडूत जवळपास पूर्ण बहुमतापर्यंत मजल मारुन साऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यामुळे या राज्यातील ‘द्रविडी’ एकाधिकाराला फार मोठा धक्का बसला. विजय याच्या पक्षाला या राज्यातील  234 पैकी 108 जागा मिळाल्या असून दुसऱ्या स्थानी द्रमुक आघाडी आहे. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पदरात मोठे अपयश पडले असून ती तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे.

आसाममध्ये रालोआची ‘हॅटिट्रिक’

आसाममध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने विजयाची हॅटट्रिक साजरी केली आहे. मुख्यमंत्री हिमांत बिस्व सर्मा यांच्या नेतृत्वात या आघाडीने 126 पैकी 101 जागा पटकावत चार पंचमांश बहुमत मिळविण्याचा प्रचंड पराक्रम गाजवला आहे. काँग्रेसला कशाबशा 20 जागा मिळाल्या आहेत. या राज्यातील भारतीय जनता पक्षाचे हे आतापर्यंतचे सर्वाधिक मोठे यश आहे.

केरळम् काँग्रेसकडे

केरळम् या राज्यात काँग्रेस आघाडीने डाव्या आघाडीवर मात करुन मोठे यश संपादन केले आहे. काँग्रेस आघाडीला 140 जागांपैकी 98 जागा मिळाल्या आहेत. तर प्रतिस्पर्धी डाव्या आघाडीला 36 जागांवर समाधान मानावे लागेल. सलग 10 वर्षांच्या सत्ताकाळानंतर आता डाव्या आघाडीला विरोधात बसावे लागणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या पदरी पुन्हा निराशा पडली असली, तरी 3 जागा जिंकून या पक्षाने राज्यातील आतापर्यंतची आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदविली आहे.

पुद्दुचेरीतील बहुमत कमी होत आहे

मागच्या निवडणुकीत या केंद्रशासित प्रदेशात सत्तेवर आलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला या निवडणुकीत विरोधकांनी तीव्र आव्हान दिल्याचे दिसून येत आहे. आघाडीला 30 पैकी 16 जागा मिळून निसटते बहुमत मिळाले आहे. मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांचा पक्ष या केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक मोठा ठरला असून तामिळनाडूत आश्चर्य घडविलेल्या टीव्हीकेने येथेही 1 जागा घेत प्रवेश केला आहे.

दोन विद्यमान मुख्यमंत्री पराभूत

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन मोठ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या निवडणुकीत पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर मतदारसंघातून दारुण पराभव झाला असून त्यांना भारतीय जनता पक्षाच्या शुभेंदू अधिकारी यांनी …..मतांनी पराभूत केले. तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन त्यांच्या पांरपरिक कोलाथूर मतदारसंघातून हरले आहेत.

अनेक राज्यात भूकंप…

ड पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या दारुण पराभवाने केंद्रातील समीकरणेही परिवर्तीत होण्याची शक्यता. विरोधकांच्या आघाडीला मोठा धक्का.

ड तामिळनाडूत द्रविडी राजकारणाला प्रथमच मोठा हादरा. 1967 पासून सातत्याने द्रमुक किंवा अण्णाद्रमुक आघाडीची सत्ता. आता तर मोठे परिवर्तन.

ड केरळमध्ये काँग्रेस आघाडीच्या विजयामुळे डाव्या आघाडीचा शेवटचा गड ढासळला. यापूर्वी त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमधून डावी आघाडी सत्तेबाहेर.

ड विरोधी पक्षांच्या आघाडीत तीव्र मतभेदांचे संकेत. राहुल गांधी यांनी निवडणूक परिणामांपूर्वीच बॅनर्जी यांना पराभवासाठी कारणीभूत मानल्याने तणाव.

श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्मरण

भारतीय जनता पक्षाचा मूळ पक्ष असणाऱ्या जनसंघाचे संस्थापक दिवंगत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे पश्चिम बंगालचेच आहेत. 1951-1952 मध्ये झालेल्या प्रथम लोकसभा निवडणुकीत जनसंघाचे तीन खासदार निवडून आले होते. त्यांच्यापैकी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह दोन पश्चिम बंगालमधून होते. संपूर्ण काश्मीर भारताला मिळावे यासाठी मुखर्जी यांनी देशव्यापी आंदोलन करत आत्मबलिदान केले. तथापि, नंतरच्या काळात जनसंघ आणि भारतीय जनता पक्ष या राज्यातून जवळपास लुप्त झाले. पण गेल्या पंधरा वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे आज हा पक्ष आपल्या मूळ पक्षाच्या संस्थापकाच्या राज्यात प्रचंड बहुमताने विजय होणे, हा ‘स्वर्गीय न्याय’ मानला जात आहे. या पक्षाच्या अनेक नेत्यांनी आज मुखर्जी यांचे स्मरण करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

कोणत्या राज्यात कसे बलाबल…

पश्चिम बंगाल

एकंदर जागा 294 (मतदान 203)

भारतीय जनता पक्ष 205 (मते 46.68 टक्के)

तृणमूल काँग्रेस 82 (मते 40.58 टक्के)

काँग्रेस 2 (मते 3.24 टक्के)

डावी आघाडी 2 (मते 4.16 टक्के)

अन्य 2 (6.58 टक्के)

तामिळनाडू

एकंदर जागा 234

टीव्हीके 106 (मते 34.90 टक्के)

द्रमुक आघाडी 74 (मते 31.46 टक्के)

राष्ट्रीय लोकशाही आघाडी 52 (मते 27.68 टक्के)

इतर 1 (मते 6.44 टक्के)

केरळ

एकंदर जागा 140

युनायटेड डेमॉव्रेटिक फ्रंट 99 (मते 39.46 टक्के)

लेफ्ट डेमॉक्रेटिक फ्रंट 35 (मते 35.48 टक्के)

भारतीय जनता पक्ष 3 (मते 11.42 टक्के)

अपक्ष, इतर 3 (मते 13.46 टक्के)

आसाम

एकंदर जागा 126

भारतीय जनता पक्ष 82 (मते 37.98 टक्के)

आसाम गण परिषद 10 (6.45 टक्के मते)

बोडो पीपल्स फ्रंट 10 (मते 3.74 टक्के)

काँग्रेस 22 (मते 29.69 टक्के)

युडीएफ 2 (मते 5.45 टक्के)

इतर 3 (मते 10.19 टक्के)

पुद्दुचेरी

एकंदर जागा 30

एआयएनआरसी 12 (मते 22.75 टक्के)

भारतीय जनता पक्ष 4 (मते 12.45 टक्के)

द्रमुक 5 (मते 14.03 टक्के)

टीव्हीके 2 (मते 16.50 टक्के)

अपक्ष, इतर 7 (मते13.02 टक्के)

 

Comments are closed.