२२ गावपाड्यांना फक्त १ टँकर, मोखाडावासीयांना पाणी टंचाईच्या भीषण झळा
प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या मोखाडावासीयांना आता पाणीटंचाईच्या भीषण झळा बसत आहेत. घोटभर पाण्यासाठी गावकऱ्यांना अक्षरशः संघर्ष करावा लागत आहे. शासनाची जलजीवन मिशन योजना घरघर लागली असून दिवसागणिक टंचाईग्रस्त गावपाड्यांमध्ये वाढ होत चालली आहे. पावसाळा सुरू होण्यास अजून दोन महिने बाकी असताना एप्रिल महिन्यातच टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या २२ वर पोहोचली आहे. त्यांना फक्त १ टँकरने पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे.
जसजशी उन्हाची तीव्रता वाढत आहे तसतशी मोखाड्यातील टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या वाढत आहे. तालुक्यातील विहिरींनी तळ गाठला आहे. नळ पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींचा पाण्याचा स्रोत आटला आहे. माता-भगिनींना रखरखत्या उन्हात पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. मोखाड्यातील १९ पाडे आणि ३ गावांना शासनाने टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे. या २२ गावपाड्यांतील सुमारे ६ हजार २८२ नागरिक आणि २ हजार ४५४ पशुधन असे एकूण ८ हजार ७३६ नागरिक व जनावरांची टँकरने पाणीपुरवठा करून तहान भागवली जात आहे.
टंचाईग्रस्त गावपाडे
धामोडी, गोळीचापाडा, डोंगरवाडी, बाडलपाडा, हेवडवाडी, जांभूळवाडी, हुंड्याचीवाडी, वडपाडा, बिबळपाडा, धामणी, कुरव, मोरघरपाडा, धनगरवाडी, धानवळ, फणसपाडा, सोनारवाडी, मोधपाडा, हनुमान टेकडी, भोयपाडा यांसह अन्य तीन गावपाड्यांना १ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाई आळा बसावा म्हणून शासनाने केटी बंधारे, राष्ट्रीय पेयजल योजना, जलयुक्त शिवार आणि त्यानंतर जल जीवन मिशन ही महत्त्वाकांक्षी योजना आणली. मात्र तरीही मोखाडावासीयांच्या घराला कोरड पडली आहे.
तालुक्यात चार धरणे असली तरी त्यातून गावकऱ्यांना पाणीपुरवठा होत नाही.
तालुक्यात साडेचारशे विहिरी असून सर्वांनी तळ गाठला आहे. तसेच १०० बोअरिंग आहेत पण त्यातील अनेक बंद आहेत.
गेल्या वर्षी पावसाळा सुरू होईपर्यंत ३७ गावपाड्यांना १२ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता.
Comments are closed.