“27 कोटी रुपयांची किंमत नेहमीच चांगल्या कामगिरीची हमी देत नाही”, रिषभ पंतबद्दल कोण म्हणाले असे वाचा सविस्तर
आयपीएल २०२६ मध्ये रिषभ पंतची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. त्याने नऊ सामन्यांमध्ये केवळ २०४ धावा केल्या आहेत. या हंगामात रिषभ पंत पुन्हा एकदा नेतृत्वाची जबाबदारी पार पाडत असून त्याच्यावर चांगलाच दबाव आला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपर जायंट्स गुणतालिकेच्या तळाशी आहे. यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहेत. एलएसजीचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनी मात्र त्याचा बचाव केला आहे.
सोमवारी (४ मे) वानखेडे स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स संघ भिडले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एलएसजी आठ षटकांत एख विकेट गमाववत १२३ धावसंख्येवर होता, मात्र संघाला २० षटकात पाच विकेट गमावत २२८ धावा करता आल्या. यामध्ये एलएसजीचा ६ विकेट्सने पराभव झाला. त्यानंतर पुन्हा एकदा पंतच्या लिलावातील किंमतीबद्दल आणि त्याच्या कामगिरीवरून चर्चा सुरू झाल्या.
पंतला एलएसजीने मोठ्या रकमेत संघात घेतले होते, मात्र मागील हंगामाप्रमाणे या हंगामातही त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही. २७ कोटी रुपयांची किंमत नेहमीच चांगल्या कामगिरीची हमी देत नाही, असे वक्तव्य लॅंगर यांनी सामन्यानंतर केले आहे.
“खरे सांगायचे तर, मला नाही वाटत याचा पैशाशी काही संबंध आहे. माझ्या मते नेतृत्व हे कठीण पद आहे. तुमच्यावर दबाव असतो आणि त्याला हे माहित आहे. तो संघासाठी खूप दबाव उचलत आहे. तो सातत्याने आपले सर्वोत्तम देण्याचा आणि कठोर परिश्रम करण्याचा प्रयत्न करत आहे”, असे लॅंगर यांनी पंतबद्दल सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
लॅंगर पुढे म्हणाले, “आम्ही दोन दिवसांपूर्वीच येथे एक सराव सामना खेळलो आणि त्यामध्ये पंतने ४० ते ३० चेंडूत ९५ धावा केल्या होत्या. हे पाहता तो सर्वोत्तम कामगिरी करत असल्याचे दिसले.”
“कसोटी क्रिकेटमध्ये त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवले आहे. दोन दिवसांपूर्वी तो ज्या प्रकारे फलंदाजीला आला, ते संघासाठी एक उत्तम लक्षण आहे. भविष्यात तो आम्हाला सामने जिंकण्यास मदत करेल”, असेही लॅंगर यांनी म्हणताना पंतवर विश्वास दर्शविला आहे.
सामन्याचे म्हटले तर एमआयच्या विजयात त्यांचे सलामीवीर रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी एलएसजीची गोलंदाजी उद्ध्वस्त केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६५ चेंडूत १४३ धावांची भागीदारी केली. रोहित ८४ आणि रायन ८३ धावा करत बाद झाले. नंतर आलेल्या नमन धीर आणि विल जॅक्स यांनी विजय मिळवून दिला. संघाने १८.४ षटकांतच लक्ष्य गाठले.
Comments are closed.