कतारच्या हवाई हद्दीत अमेरिकेचे विमान बेपत्ता

इराण युद्धामुळे आखातील देशांमध्ये तणाव वाढलेला असताना कतरच्या हवाई हद्दीत अमेरिकेचे ‘केसी-135 स्ट्रेटोटँकर’ हे विमान रडारवरून अचानक गायब झाले. लढाऊ विमानांमध्ये या विमानातून हवेतच इंधन भरता येते. विमानाच्या वैमानिकाने आपत्कालीन संदेश पाठवला होता. त्यानंतर लगेच विमानाचा संपर्क तुटला.

प्राप्त माहितीनुसार, विमानाने यूएईच्या अल धफरा या हवाई तळावरून उड्डाण घेतले होते. विमान फारसच्या खाडीवरून उडत असताना कतरच्या हवाई हद्दीत विमानाचा संपर्क अचानक तुटला. रडारवरून विमान गायब झाले. विमानाने काही वेळ आकाशात घिरटय़ा घातल्या आणि त्यानंतर खाली येऊ लागले. पुढे विमानाचे काय झाले, याबाबत अमेरिकेकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, इराणने सोमवारी यूएईच्या फजैरा येथे केलेल्या हल्ल्यानंतर हिंदुस्थानने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या हल्ल्यात तीन हिंदुस्थानी नागरिक जखमी झाले होते.

इराणच्या ‘फार्स’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विमानाने ‘7700’ हा आपत्कालीन संदेश पाठवला होता. विमानात कोणतीही गंभीर समस्या निर्माण झाल्यानंतरच हा संदेश पाठवण्यात येतो. मात्र, विमान बेपत्ता होण्यामागे इराणची कोणतीही भूमिका नाही, असे स्पष्ट करण्यात आले. यापूर्वी इराणने अमेरिकेच्या आखाती देशांमधील तळांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये अमेरिकेची डझनभर विमाने नष्ट केली होती. त्यात केसी-135 प्रकारच्या विमानांचाही समावेश होता.

युद्धबंदी मोडणार नाही!

इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकन नौदलाच्या जहाजावर हल्ला केला होता. त्यानंतरही अमेरिका युद्धबंदी मोडणार नाही. इराण लहान हल्ले करत आहे, मात्र मोठय़ा युद्धासारखी सध्या परिस्थिती नाही. पुन्हा युद्ध सुरू करण्याचा निर्णय सरकार घेईल, असे अमेरिकेचे जनरल केन यांनी सांगितले.

इराणच्या हल्ल्यात तीन हिंदुस्थानी जखमी

इराणने यूएईच्या फुजैरा येथे 15 क्षेपणास्त्रs आणि 4 ड्रोनद्वारे हल्ले केले होते. त्यात तीन हिंदुस्थानी नागरिक जखमी झाले. यावरून हिंदुस्थानने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तीन हिंदुस्थानी नागरिक जखमी होणे स्वीकारार्ह नाही. सर्वसामान्य नागरिक आणि नागरिकांसाठी असलेल्या पायाभूत सुविधांवरील हल्ले तत्काळ थांबवले पाहिजेत. चर्चेतूनच सर्व समस्या सोडविण्यात याव्या तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार होर्मुझमधून कोणत्याही अडथळय़ाविना जहाजांची वाहतूक सुरळीत झाली पाहिजे, असे हिंदुस्थाने स्पष्ट केले आहे.

Comments are closed.