नालेसफाई फक्त कागदावरच… वाकोल्यातील नाला कचऱ्याने तुडुंब भरला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पावसाळा तोंडावर आला तरी मुंबई महापालिकेकडून अजूनही नालेसफाई पूर्ण झालेली नाही. वाकोल्यातील नाला कचऱ्याने तुडुंब भरला असून घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पावसाळय़ापूर्वी नाला स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

दरवर्षी पावसाळय़ापूर्वी पालिकेकडून मुंबईतील नाल्यांची साफसफाई केली जाते. अवघ्या काही दिवसांवर पावसाळा सुरू होणार आहे तरीही पालिकेकडून अत्यंत धीम्या गतीने नालेसफाईचे काम सुरू आहे. त्यामुळे शहरातील बहुतेक नाले कचऱयाने तुडुंब भरलेले दिसत आहेत. अशीच अवस्था सांताक्रुझ पूर्व येथील वाकोला नाल्याची आहे.

कचऱयाने हा नाला तुडुंब भरल्यामुळे प्रवाहास अडथळा निर्माण होत आहे. घाणीच्या साम्राज्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे पावसाळय़ात नाल्यालगतच्या परिसरात राहणाऱया शिवाजी नगर, चैतन्य नगर, टीचर्स कॉलनी, धोबीघाट, आनंद नगर येथील शेकडो कुटुंबीयांना याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. धोबीघाट परिसरात नाला रुंदीकरणाचा प्रस्तावदेखील अजूनही प्रलंबित आहे.

युद्धपातळीवर सफाई करा

पालिकेकडून वाकोला परिसरात मिठी नदी कल्पना सिनेमापासून कपाडिया नगरपर्यंत वरवर नालेसफाई करण्यात येत आहे. पावसाळा तोंडावर आल्यामुळे पालिकेने युद्धपातळीवर मोहीम हाती घेऊन वाकोला परिसरातील नाल्यांची स्वच्छता करावी, अशी मागणी शिवसेना आमदार संजय पोतनीस यांनी केली.

काही वर्षांपूर्वी पावसाळय़ात धोबीघाट परिसरात घर कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला होता. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पालिकेने वेळीच पावले उचलावी, याकडेदेखील त्यांनी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. येथील नालेसफाई वेळेत पूर्ण व्हावी यासाठी नगरसेवक गीतेश राऊत आणि नगरसेविका शर्वरी परब यादेखील पालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करत आहेत.

Comments are closed.