मुंबई महापालिकेचे सर्व व्यवहार 10 मेपासून ‘ई-टीडीआर’ प्रणालीद्वारे

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बृहन्मुंबई महापालिकेने 10 मेपासून प्रशासकीय कामकाजातील सर्व व्यवहार ‘ई-टीडीआर’ प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हस्तांतरणीय विकास हक्कांचे (टीडीआर) व्यवहार अधिक पारदर्शक आणि वेगवान होणार आहेत. या ‘ई-टीडीआर’ प्रणालीमुळे जुन्या पद्धतीचे व्यवहार पूर्णपणे बंद होणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या पुढाकारातून व महानगरपालिकेच्या सहकार्याने हस्तांतरणीय विकास हक्क व्यवहारांसंदर्भातील देशातील पहिले एकात्मिक डिजिटल व्यासपीठ म्हणजेच ई-टीडीआर प्रणाली 15 एप्रिलपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला जुनी आणि नवीन अशा दोन्ही पद्धती समांतर सुरू होत्या, मात्र आता 10 मेपासून सर्व खरेदी-विक्री व्यवहारांसाठी ‘ई-टीडीआर’ प्रणालीद्वारे होणार आहेत.

महापालिकेच्या https://etdr.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ही प्रणाली उपलब्ध आहे. या प्रणालीमुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता येणार असून खरेदीदार-विव्रेते शोधणे सोपे होणार आहे. तसेच बँक खात्याद्वारे सुरक्षित आर्थिक व्यवहार, कालबद्ध मंजुरी आणि व्यवहार पूर्ण होताच ‘विकास हक्क प्रमाणपत्र’ थेट संबंधितांच्या नावावर हस्तांतरित करणे अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी 10 मे पूर्वी आवश्यक नोंदणी व प्रक्रिया पूर्ण करून नव्या ई-टीडीआर प्रणालीचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

माहितीसाठी विशेष कक्ष

नागरिक आणि विकासकांची गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेकडून त्यांच्या मदतीसाठी संकेतस्थळावर व्हिडीओ मार्गदर्शक आणि ‘यूजर मॅन्युअल’ उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी महापालिका मुख्यालयातील ‘विकास नियोजन’ कार्यालयात प्रत्यक्ष सहाय्य कक्षही स्थापन करण्यात आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

Comments are closed.