अवकाळीने सांगलीत दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
सांगली जिल्ह्यात मार्च, एप्रिल महिन्यांत झालेल्या वादळी वाऱयासह गारपीट आणि पूर्व मोसमी पावसामुळे चार हजारांवर शेतकऱयांच्या 1982 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. बाधित पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून, शासनाकडे 4 कोटी 43 लाख रुपयांच्या भरपाईची मागणी कृषी विभागाकडून करण्यात आली आहे.
सांगली जिह्यात मार्च आणि एप्रिल महिन्यांत सलग तीन दिवस वादळी वारे, गारपीट आणि पावसाने हजेरी लावली होती. मिरज, वाळवा, खानापूर, तासगाव, आटपाडी, जत आणि कवठेमहांकाळ या सात तालुक्यांत द्राक्ष, डाळिंब बागांसह रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसला. आटपाडी, मिरज, खानापूर आणि जत तालुक्यांना गारपिटीचा सर्वाधिक तडाखा बसला, तर शिराळा आणि पलूस तालुक्यांत तुलनेने कमी नुकसान झाले. कडेगाव तालुक्यात या पावसाने काहीच नुकसान झाले नाही.
कृषी विभागासह संबंधित यंत्रणांनी तातडीने पंचनामे पूर्ण केले. अहवालानुसार, जत तालुक्यात सर्वाधिक 1739 शेतकऱयांच्या 531 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, या तालुक्यासाठीच 1 कोटी 11 लाख रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात आली आहे. आटपाडी आणि खानापूर तालुक्यांतही नुकसान झाले आहे. शासनाच्या निकषांनुसार एकूण नुकसान 4 कोटी 43 लाख रुपयांचे ठरविण्यात आले आहे. हा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला असून, लवकरात लवकर मदत मिळावी, अशी अपेक्षा बाधित शेतकऱयांकडून व्यक्त होत आहे.
Comments are closed.