पत्नी, मुलाला बेदम मारहाण; मंत्री अतुल सावेंच्या OSD चे क्रूर कृत्य, महिला सुरक्षेच्या गप्पा मारणाऱ्या सरकारचा बुरखा फाटला! – हर्षवर्धन सपकाळ
राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांचा ‘ओएसडी’ (विशेष कार्य अधिकारी) म्हणून काम पाहणाऱ्या विजय कारंडे याने आपल्या पत्नी आणि मुलाला बॅटने बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही एक्सवर पोस्ट करून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्री अतुल सावे यांचे ओएसडी विजय कारंडे यांच्या प्रकरणाने सरकारच्या नैतिकतेचा बुरखा फाडल्याची टीका सपकाळ यांनी केली.
राज्य सरकारमधील मंत्री अतुल सावे यांचे ओएसडी विजय कारंडे यांच्या प्रकरणाने सरकारच्या नैतिकतेचा बुरखा फाडला आहे. ज्या अधिकाऱ्यांवर जनतेचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आहे, त्यांची जेव्हा स्वतःच्या पत्नीचा गळा आवळून हत्येचा प्रयत्न करण्यापर्यंत आणि निष्पाप मुलाला बॅटने मारहाण करण्यापर्यंत मजल जाते, तेव्हा महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी महिलांच्या सुरक्षेच्या गप्पा मारणे हा निव्वळ ढोंगीपणा आहे, हेच सिद्ध होतं. हे प्रकरण केवळ वैयक्तिक नसून, सत्तेच्या छत्राखाली वावरणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींना मिळालेल्या अभयाचे प्रतीक आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.
मंत्री अतुल सावे यांनी अशा हिंसक मानसिकतेच्या व्यक्तीला आपल्या दालनात स्थान देऊन प्रशासकीय व्यवस्थेचे गुन्हेगारीकरण केले आहे. ‘बेटी बचाव’च्या घोषणा देणाऱ्या सरकारने आपल्याच मंत्र्यांच्या निकटवर्तीयांच्या या अमानवीय कृत्यावर बाळगलेले मौन हे लाजिरवाणे आहे. सत्तेच्या माजातून निर्माण झालेली ही हिंसक प्रवृत्ती आणि त्याला मंत्र्यांचे लाभलेले मूक समर्थन महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला लागलेला काळा डाग आहे. अशा भ्रष्ट आणि क्रूर मानसिकतेच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व त्यांच्या सरकारला राज्यात सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही, असा निशाणाही हर्षवर्धन सपकाळ यांनी साधला.

नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय कारंडे हा नांदेडमध्ये सामाजिक न्याय विभागात कार्यरत असून, सध्या प्रतिनियुक्तीवर मंत्री अतुल सावे यांच्याकडे ओएसडी म्हणून कार्यरत आहे. 30 एप्रिलला रात्री साडेआठच्या सुमारास तो क्वीन्स गार्डनमधील घरी आला होता. त्यावेळी पत्नी रूपालीने त्याला तीन महिन्यांपूर्वी मोबाइलवर झालेल्या चॅटिंगची विचारणा केली. त्याचा राग आल्यामुळे विजयने तिला फोडून काढेन असे म्हणत मारहाण केली होती. आरोपीची पत्नी रूपाली कारंडे हिने याबाबत तक्रार केली होती. विजयने बॅटने केलेल्या मारहाणीत रूपाली यांच्यासह मुलगा कृष्ण जखमी झाले आहेत.
Comments are closed.