असुर्डे मनवेवाडी येथे गुरांच्या गोठ्याला भीषण आग; दोन लाखांचे नुकसान
संगमेश्वर तालुक्यातील असुर्डे मनवेवाडी येथे गुरांच्या गोठ्याला अचानक लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, ग्रामस्थांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे गोठ्यातील दोन बैलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून मोठी जीवितहानी टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, असुर्डे मनवेवाडी येथील चंद्रकांत भागोजी मनवे यांच्या घराच्या शेजारीच त्यांचा गुरांचा गोठा आहे. मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास या गोठ्याला अचानक आग लागली. आगीच्या ज्वाळा पाहून जवळच काम करत असलेल्या ग्रामस्थांनी तातडीने धाव घेतली आणि आरडाओरडा करून मदतीसाठी इतरांना बोलावले.
आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी घरातील पाणी आणि जवळच असलेल्या बोअरवेलच्या साहाय्याने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. गोठ्यात दोन बैल बांधलेले होते, त्यांना ग्रामस्थांनी आगीच्या विळख्यातून सुरक्षितपणे बाहेर काढले. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत गोठ्यातील साहित्य आणि बांधकामाचे मिळून अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले होते.
घटनेची माहिती मिळताच असुर्डेचे सरपंच प्रदीप शिंदे, तलाठी अमर फडतरे, ग्रामसेवक कांबळे, कोतवाल संदेश शिंदे आणि वरिष्ठ लिपिक अजय पड्याळ यांनी घटनास्थळी भेट दिली. महसूल विभागातर्फे नुकसानीचा रितसर पंचनामा करण्यात आला असून, संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
Comments are closed.