उद्या या सरकारने महिला सुरक्षेवर निर्लज्जपणे… रोहित पवार यांची जळजळीत टीका
राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांचा ‘ओएसडी’ (विशेष कार्य अधिकारी) म्हणून काम पाहणाऱ्या विजय कारंडे याने आपल्या पत्नी आणि मुलाला बॅटने बेदम मारहाण केली. या मारहाणीचे धक्कादायक फोटो समोर आले आहेत. यात कारंडे यांच्या पत्नीच्या अंगावर मारहाणीच्या गंभीर जखमा दिसून येत आहेत. या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
मंत्री सावे साहेब यांच्या PA ने पत्नीला केलेल्या जबर मारहाणीचे बाहेर आलेले फोटो हे हादरवणारे आहेत. पण हे फोटो बघूनही दगडासारखं ढिम्म बसलेल्या आणि भावना मेलेल्या या असंवेदनशील सरकारला कुठलाही पाझर फुटणार नाही… कदाचित उद्या या सरकारने महिला सन्मानावर किंवा महिला सुरक्षेवर…
– रोहित पवार (@RRPSpeaks) 6 मे 2026
”मंत्री सावे साहेब यांच्या PA ने पत्नीला केलेल्या जबर मारहाणीचे बाहेर आलेले फोटो हे हादरवणारे आहेत. पण हे फोटो बघूनही दगडासारखं ढिम्म बसलेल्या आणि भावना मेलेल्या या असंवेदनशील सरकारला कुठलाही पाझर फुटणार नाही… कदाचित उद्या या सरकारने महिला सन्मानावर किंवा महिला सुरक्षेवर निर्लज्जपणे व्याख्यान ठोकून जनतेला ज्ञानामृत पाजले तरी आश्चर्य वाटणार नाही”, अशी जळजळीत टीका रोहित पवार यांनी केली आहे.
विजय कारंडे याची पत्नी रूपाली कारंडे यांनी त्याच्याविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय कारंडे हा नांदेडमध्ये सामाजिक न्याय विभागात कार्यरत असून, सध्या प्रतिनियुक्तीवर मंत्री अतुल सावे यांच्याकडे ओएसडी म्हणून कार्यरत आहे. 30 एप्रिलला रात्री साडेआठच्या सुमारास तो क्वीन्स गार्डनमधील घरी आला होता. त्यावेळी पत्नी रूपालीने त्याला तीन महिन्यांपूर्वी मोबाइलवर झालेल्या चॅटिंगची विचारणा केली. त्याचा राग आल्यामुळे विजयने तिला फोडून काढेन असे म्हणत मारहाण केली होती.
Comments are closed.