मोठी बातमी ! पुण्यात भाजप नगरसेविकेमधला वाद चिघळला; अर्चना पाटलांसह पतीवरही ॲट्रॉसिटीचा गुन्हा

पुणे : शहरातील राजकीय वातावरण तापले असून भाजपच्या (BJP) नवनिर्वाचित नगरसेविकांमधील वादावादी नव्याने समोर आली आहे. पुण्यात (Pune) भाजप नगरसेविकांमधला वाद चांगलाच चिघळला असून भाजपच्या नगरसेविका अर्चना पाटील आणि त्यांचे पती तुषार पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. येथील खडक पोलीस ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपच्याच नगरसेविका मृणाल कांबळे यांचे भाऊ बापू कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा (Crime news) दाखल करण्यात आला.

पुणे महापालिका निवडणुकीपासून पाटील आणि कांबळे कुटुंबांमध्ये राजकीय वाद आणि मतभेद सुरू होते. निवडणूक प्रचारावेळी पाटील दांपत्याने जातीय द्वेषातून निवडणूक कार्यालयावरील बॅनर काढणे, कांबळे यांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करणे, तसेच विजयानंतर त्यांच्या घरासमोर लावलेल्या बॅनरवरुनही वाद निर्माण केल्याचा आरोप बापू कांबळ यांनी दिलेल्या फिर्यादीतून करण्यात आला आहे. तसेच पाटील हे जाणीवपूर्वक एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, याआधी भाजपच्या नगरसेविका अर्चना पाटील यांनी मृणाल कांबळे यांच्याविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.

मुख्यमंत्र्यांना लिहिले होते पत्र

विशेष म्हणजे पुण्यातील भाजप नगरसेविकांचा हा वाद काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचला होता, हा वाद केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न राहता थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्यानंतही आता याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. नगरसेविका अर्चना पाटील यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. ‘पक्षांतर्गत अनेकदा तक्रारी करुनही तोडगा निघाला नाही, त्यामुळे आता नाईलाजास्तव पोलिसांत धाव घ्यावी लागली,’ अशी भूमिका पाटील यांनी घेतली होती. या तक्रारीमुळे भाजपच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली होती.

यापूर्वी वादाचा व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यातील वसतिगृहाच्या कामावरून भाजपच्या (BJP) आजी-माजी नगरसेविकांमध्येही तुफान खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले होते. दोन गटातील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. वसतिगृहाच्या कामाच्या टक्केवारीवरून दोन महिलांमध्ये आरोप-प्रत्यारोप केलेला वाद चव्हाट्यावर आला. बाणेरमधील माजी नगरसेविका राजश्री काळे आणि विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्यात हा वाद रंगला होता. आता, नगरसेविका अर्चना पाटील आणि मृणाल कांबळे यांच्यातील वाद टोकाला गेला असून पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा; उपराष्ट्रपतींकडे पत्र सादर, बारामती विजयानंतर तातडीने निर्णय

आणखी वाचा

Comments are closed.