आश्चर्यच… आंब्याच्या झाडाला सीताफळ, भिवंडीत निसर्गाचा चमत्कार
एखाद्या झाड्याला कलम करून वेगवेगळी पिकं घेतली जातात हे आपण अनेकदा बघितले आहे. मात्र भिवंडीतील आंब्याच्या झाडाला कलम न करताच सीताफळ लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दुगाड फाटा परिसरातील साईगाव अस्नोली येथे राहणाऱ्या जयेश पटेल यांच्या घरासमोरील ८ वर्षांपूर्वी लावलेल्या आंब्याच्या झाडाला सीताफळ लागले आहे. एकाच झाडावर दोन विविध प्रजातींची फळे येणे हा निर्सगाचा चमत्कारच मानला जात असून हे झाड पाहण्यासाठी नागरिक गर्दी करून फोटो काढत आहेत.
तालुक्यातील दुगाड फाटा परिसरातील साईगाव अस्नोली येथे राहणारे व्यावसायिक जयेश पटेल यांच्या अंगणात आठ वर्षांपूर्वी आंब्याचे झाड लावले होते. सध्या या झाडाला आंबे लागले आहेत. मात्र झाडाखाली खेळत असताना लहान मुलांना काही तरी वेगळे दिसले. निरखून पाहिल्यावर आंब्याच्या झाडाला सीताफळ लागल्याचे मुलांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ याची माहिती वडील जयेश पटेल आणि आजी जयाबेन पटेल यांना दिली. सुरुवातीला त्यांच्यावर कुणीच विश्वास ठेवला नाही. मात्र प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर तेही आश्चर्यचकीत झाले.
कोणत्याही प्रकारचे कलम केलेले नाही
नात नेहा ही झाडाखाली खेळत असताना तिचे लक्ष झाडावर गेले. तेव्हा ती अचंबित झाली. मुलीने घरात येऊन ही बाब वडिलांना सांगितली. तेव्हा हा प्रकार समोर आला. हा चमत्कात पाहण्यासाठी लांबून लांबून लोक येत आहेत. आम्ही झाडाला कोणतेही कलम केलेले नाही किंवा चिटकवले नाही. याची खात्री अनेकांनी केली आहे. पण हा नैसर्गिक चमत्कार असल्याचे जयेश पटेल यांनी सांगितले.
Comments are closed.