पश्चिम रेल्वेची फुकट्या प्रवाशांकडून 27 कोटींची दंडवसुली; एप्रिल महिन्यात विक्रमी कमाई
पश्चिम रेल्वे प्रशासनाने विनातिकीट प्रवाशांवर कारवाईची मोहिम तीव्र केली आहे. उन्हाळी सुट्टीत बाहेर फिरायला जाणार्या प्रवाशांचे प्रमाण जास्त आहे. या पार्श्वभूमीवर तिकीट तपासणी मोहीम तीव्र करीत पश्चिम रेल्वेने एप्रिल महिन्यात विक्रमी दंड वसुली केली. महिनाभरात तब्बल 27.26 कोटी रुपयांचा दंड वसूल केला. मे महिन्यात हा आकडा आणखी वाढू शकतो, अशी शक्यता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
रेल्वेच्या इतिहासातील आतापर्यंतची एका महिन्यातील ही सर्वात मोठी वसुली ठरली आहे. याआधी मे 2022 मध्ये 25.98 कोटी दंड वसुल करण्यात आला होता. हा विक्रम मोडीत काढत एप्रिल 2026 मध्ये यात 5 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
एप्रिल महिन्यात एकूण 3.60 लाख विनातिकीट आणि अनियमित प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. एप्रिल 2025 मध्ये ही रक्कम 21.89 कोटी रुपये इतकी होती. या रकमेत यंदा 25 टक्के वाढ झाली आहे. तसेच वसूल केलेली रक्कम ही निर्धारित उद्दिष्टापेक्षा 13 टक्क्यांहून अधिक आहे. मुंबई सेंट्रल विभागाने 13.06 कोटी रुपयांचा दंड वसूल केला. त्याखालोखाल अहमदाबाद 4.22 कोटी आणि रतलाम विभागाने 3.41 कोटी रुपये दंड वसूल केला.
उपनगरीय एसी लोकल गाड्यांमध्येही विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या. एप्रिल 2026 मध्ये एसी लोकल गाड्यांमध्ये 14 हजारांहून अधिक विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. यात 44 लाख रुपये दंडवसुली करण्यात आली.
Comments are closed.