भद्रकाली प्रॉडक्शन्सची 60वी नाटय़कृती रंगभूमीवर
गेल्या 44 वर्षांची दिमाखदार परंपरा असलेल्या भद्रकाली प्रॉडक्शन्स या नाटय़ संस्थेची साठावी कलाकृती असलेले ‘सांगा कसं जगायचं’ हे नवंकोरं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
1982 साली मालवणी भाषेला रंगभूमीवर पानाचे पान मिळवून देणाऱ्या अभिनेते-निर्माते मच्छिंद्र कांबळी यांनी भद्रकाली या नाटय़संस्थेची पायाभरणी केली होती आणि ‘चाकरमानी’ हे पहिले नाटक सादर केले होते. त्यानंतर अनेक नाटककारांची, विविध विषयांवरची नाटके या संस्थेने सादर करून एक वेगळा पायंडा पाडला आणि विश्वासार्हता निर्माण केली. दर्जेदार नाटय़कृती आणि उत्तम निर्मितीमूल्ये हे भद्रकालीचे वैशिष्टय़ आहे. मच्छिंद्र कांबळी यांच्यानंतर त्यांच्या पत्नी कविता मच्छिंद्र कांबळी आणि मुलगा प्रसाद कांबळी यांनी ही धुरा समर्थपणे सांभाळली आणि आता या संस्थेची साठावी नाटय़कृती ‘सांगा कसं जगायचं?’ रसिकांसमोर सादर होतेय.
डॉ. सत्यजित खारकर हे मूळ लेखक असून नीरज शिरवईकर यांनी रंगावृत्ती तयार केलीय आणि दिग्दर्शनही त्यांचेच आहे. या नाटकाच्या निमित्ताने स्वानंदी टिकेकर आणि स्पृहा जोशी या दोघी प्रथमच रंगभूमीवर एकत्र येत आहेत. त्यांच्यासोबत निषाद भोईर, श्रद्धा पोखरणकर, अमेय बर्वे आणि सागर आठलेकर ही कलाकार मंडळी आहेत.
Comments are closed.