पैशांसाठी नाही, तर हिंदुस्थानसाठी खेळायचंय! त्रिशतकासह इतिहास रचणाऱ्या मराठमोळ्या आयरा जाधवची मुलाखत

>>प्रसाद लाड<<

सध्याच्या क्रिकेटपटूंना आयपीएल खेळलो की जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. पण या सर्वांमध्ये ‘ती’ वेगळी ठरते. महिला क्रिकेटमध्ये त्रिशतक रचत तिने इतिहास रचला आणि तिचं आयुष्य बदललं. बीसीसीआयनेही पुरस्कार देऊन तिचा सम्नान केला. काही दिवसांपूर्वी मुंबई टी-20 लीगसाठी खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावात सर्वाधिक बोलीची मानकरी ठरली ती मराठमोळी आयरा जाधव. अर्जुन तेंडुलकरला जेवढी रक्कम मिळाली तेवढीच आयरालाही यावेळी देण्यात आली. घरात क्रिकेटचा गंधही नाही, पण जाधवांची लेक थेट क्रिकेटमधील एका मोठय़ा टप्प्यावर पोहोचली आहे. त्यानंतर आयरा जाधवची घेतलेली ही मुलाखत.

सातारा ते मुंबई व्हाया पुणे

आयरा ही खरं तर साताऱ्याची. पण काही कारणास्तव त्यांचे कुटुंब पुण्यात दाखल झालं, त्यानंतर क्रिकेटसाठी तिने थेट मुंबई गाठली. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्याच शारदाश्रम विद्यामंदिरमधून आयरा क्रिकेटचे धडे गिरवत आहे. आयरा याबाबत म्हणाली की, ‘वयाच्या आठव्या वर्षापासून मी क्रिकेटला सुरुवात केली. घरात कोणीही क्रिकेट खेळायचं नाही, पण मला आवड होती. पुण्यातील एका क्लबमध्ये खेळत असताना मी क्रिकेटमध्येच काही तरी करून दाखवायचं ठरवलं, त्यासाठी मुंबई गाठली आणि आता मी पुढच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.’

मुंबई आणि पुण्याच्या क्रिकेटमध्ये फरक काय

आयरा क्रिकेटसाठी पुण्यातून मुंबईत दाखल झाली आणि दोन शहरांतील क्रिकेटमधला फरकही तिने यावेळी सांगितला. आयरा म्हणाली की, ‘पुण्यात मी क्रिकेटला सुरुवात केली. पुण्यातही क्रिकेट चांगले फोफावलं आहे. पण पुण्यात जास्त खासगी मैदानं आहेत, पण तसं मुंबईत मात्र मला दिसलं नाही. मुंबईत क्रिकेट फार मोठय़ा प्रमाणावर खेळलं जातं. सर्व सामान्यासाठी मोठी मैदानं आहेत.’

आयराने रचला होईल इतिहास

मुंबई आणि मेघालय यांच्यात 19 वर्षांखालील क्रिकेटच्या सामन्यात आयराने इतिहास रचला होता. आयराने या सामन्यात फक्त 157 चेंडूंत नाबाद 346 धावांचा डोंगर उभारला होता. या स्पर्धेत त्रिशतक झळकावणारी ती पहिलीच हिंदुस्थानी खेळाडू ठरली होती. बीसीसीआयनेही आयराची दखल घेत सर्वोत्तम ज्युनिअर क्रिकेटपटूचा पुरस्कार देत तिचा गौरव केला.

त्रिशतक झळकावताना मनात नेमकं काय होतं

त्रिशतकाबाबत आयरा म्हणाली की, ‘माझं अर्धशतक झालं, शतक झालं, त्यानंतरही मी थकलेली नव्हती उलटपक्षी अंगात उत्साह होता. मी आक्रमक फटकेबाजी करत दीडशतकापर्यंत पोहोचली. त्यानंतर मला वाटलं की आता मला निवृत्त करतील, पण तसं काही झालं नाही. त्यामुळे मी फक्त खेळ खेळत राहिले. माझ्याकडून मोठा विक्रम रचला गेला आहे, हेदेखील मला माहिती नव्हतं. जेव्हा माझी खेळी संपवून मी संघात परतले तेव्हा मला या मोठय़ा विक्रमाबाबत सांगण्यात आलं.’

मुंबईच्या लिलावात अर्जुन तेंडुलकर एवढाच अभिव्यक्ती

मुंबई टी-20 लीगच्या लिलावात सर्वांचे लक्ष अर्जुन तेंडुलकरकडे होते. अर्जुनला सर्वाधिक दहा लाख रुपये मिळाले. तेव्हा आयराचे नावही कोणाच्या गावी नव्हते. पण जसे आयराचे नाव पुकारले गेले तेव्हा तिच्यावर सर्वच संघ तिला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी तुटून पडले, अखेर सर्वाधिक 10 लाख रुपयांची बोली तिच्यावर लागली.

लिलावाबाबत माहिती नव्हतं, आईला फोन केला अन्

लिलावाबाबत आयरा म्हणाली की, ‘मी बंगळुरूत सराव शिबिरात होते. त्यामुळे मुंबईच्या लिलावात काय चाललंय, हे माझ्या गावीही नव्हतं. माझं नावही लवकर आलं नव्हतं, त्यामुळे मला काहीच कळत नव्हतं. त्यामुळे मी आईला फोन केला. तेव्हा मला समजलं की, सर्वाधिक रक्कम मलाच मिळाली आहे. या गोष्टीचा आनंद तर होताच, पण मी हुरळून जाणारी नाही. आता माझी जबाबदारी अधिकच वाढली आहे.’

पैशांकडे लक्ष नाही, देशासाठी खेळण्याचं स्वप्न

प्रत्येक खेळाडूचे आयुष्यात काही तरी लक्ष्य असतं. याबाबत आयरा म्हणाली की, ‘आता लिलावात सर्वाधिक रक्कम मिळाल्याने मी प्रकाशझोतात आली आहे, पण पैशांकडे माझं लक्ष नाही. पैशांपेक्षा माझ्यासाठी देश महत्त्वाचा आहे. त्यामुळे मला पैशांसाठी नाही तर देशासाठी खेळायचं आहे. सध्या तरी हिंदुस्थानच्या 19 वर्षीय संघात स्थान मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे. माझे टार्गेट पैसे नाही, तर हिंदुस्थानच्या संघात एण्ट्री करणे आहे.’

Comments are closed.