Ratnagiri News – संगमेश्वर तालुक्यात मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस; आंब्यांचे नुकसान, बागायतदार हवालदिल
संगमेश्वर तालुक्यात गेले दोन ते तीन दिवस सकाळच्या वेळी आकाशात पावसाचे ढग येत होते. तसेच आज (07 मे 2026) सकाळपासूनच वातावरणात उष्मा जाणवत होता. दुपारच्या दरम्यान वातावरण चाळीस डिग्री वर पोहोचल्यानंतर सायंकाळच्या दरम्यान पावसाचा शिडकावा होणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. हवामान विभागाने देखील कोकणात आज मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. आज सायंकाळी पाच नंतर जोरदार वादळी वारे वाहून तालुक्याच्या बहुतेक सर्व भागात तुफान पर्जन्यवृष्टी झाली. या अकाली पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
गतवर्षी देखील संगमेश्वर तालुक्यात नऊ मे पासून मान्सून पूर्व पाऊस पडायला सुरुवात झाली होती. त्याच पद्धतीने यावर्षी देखील आज सात मे पासून मान्सूनपूर्व सरी बरसू लागल्या आहेत. दुपारी चार नंतर आकाशात सर्वत्र पावसाचे काळे ढग जमा होऊ लागले. पाठोपाठ आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे हा पाऊस पुढे सरकेल अशी शक्यता असताना सायंकाळी साडेचार नंतर संगमेश्वर तालुक्याच्या विविध भागात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकरी वर्गाची मोठी धावपळ झाली. तसेच परप्रांतातून कामासाठी आलेल्या कामगार वर्गाच्या झोपड्यातून पाणी शिरले. मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात होताच वीज प्रवाह खंडित झाला.
वादळी वाऱ्या पाठोपाठ पाऊस आल्याने काढणीसाठी तयार झालेले आंबे वाऱ्यामुळे खाली पडून आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी आंबा आणि काजूला चांगला मोहर आला असला तरीही पाठोपाठ आलेल्या मळभामुळे हा सर्व मोहर गळून पडला होता. त्यानंतरच्या आलेल्या मोहराने बागायतदारांना थोडीफार सावरण्यास मदत होईल असे वाटत असतानाच एप्रिल पाठोपाठ मे महिन्यातही आज पडलेल्या पावसाने तयार आंब्यांचा जमिनीवर सडा पडला. दृश्य पाहून आंबा बागायतदारांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू उभे राहिले.
संगमेश्वर तालुक्यात आज अनेक ठिकाणी जवळपास एक तासापेक्षा अधिक काळ अवकाळी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. काही ठिकाणी झाडाच्या किरकोळ फांद्या पडल्या असून यामध्ये कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. आज कोसळलेला पाऊस अवकाळी असला तरी तो जून जुलै महिन्यातील पावसाप्रमाणे भासत होता. आंब्याबरोबरच कोकम आणि अन्य रानमेव्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आज अनेक ठिकाणी साखरपुडा आणि येत्या १४ तारखेपर्यंत विवाह समारंभाचे आयोजन करण्यात आले असताना आज कोसळलेल्या जोरदार पावसाने मंडप भिजून अनेकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.
Comments are closed.