IPL 2026 – पुढे धोका आहे… बीसीसीआयने आयपीएलच्या संघांना दिली ताकीद

आयपीएल सध्या दिमाखात सुरू आहे. आयपीएलचा ज्वर टिपेला पोहोचला आहे. आयपीएलध्ये सारं काही आलबेल सुरू असेल असे बऱ्याच जणांना वाटत असेल, पण सत्य मात्र वेगळंच आहे. आयपीएलसारख्या जगद्विख्यात लीगला भविष्यात मोठा धक्का बसू शकतो आणि ही गोष्ट बीसीसीआयला चांगलीच माहिती आहे. त्यामुळे बीसीसीआयने आता कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. पुढे असलेला धोका लक्षात घेत बीसीसीआयने आयपीएलमधील सर्व दहा संघांना अत्यंत कडक शब्दांत लिहिलेली मार्गदर्शक सूचना पाठवली आहे. ज्यामध्ये त्यांनी आयपीएल आणि संघांना नेमका कोणता आणि कसा धोका आहे, हे म्हटले आहे.

बीसीसीआयने आयपीएलच्या संघांना धारेवर धरले

बीसीसीआयने आयपीएल फ्रँचायझींना वर्तणूक, सांघिक शिस्त आणि सुरक्षा नियमावलीशी संबंधित विविध उल्लंघनांबद्दल धारेवर धरले.  गुरुवारी सर्व दहा संघांना पाठवण्यात आलेल्या या सात पानांच्या मार्गदर्शक सूचनेत बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, यापूर्वी नमूद केलेल्या या उल्लंघनांमुळे आयपीएल संबंधित फ्रँचायझी आणि खुद्द बीसीसीआयच्या प्रतिष्ठेला मोठी हानी पोहोचण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांची स्वाक्षरी असलेल्या या सूचनेत कोणत्याही विशिष्ट फ्रँचायझीचे, खेळाडूचे किंवा संघातील अधिकाऱ्याचे नाव थेट घेतले नसले तरी त्यात घडलेल्या गैरवर्तनाच्या आणि नियमावलीच्या उल्लंघनाच्या विशिष्ट बाबींकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

बीसीसीआयने कोणत्या गोष्टींचा उल्लेख केला आहे

आयपीएलचे खेळाडू असलेल्या हॉटेलच्या खोल्यांमध्ये अनधिकृत व्यक्तींचा वावर असल्याचे समोर आले आहे. या व्यक्ती नेमक्या कोण आहेत आणि त्यांचा उद्देश काय आहे, हे कोणालाही माहिती नाही. त्याचबरोबर सामना सुरू असताना मैदानातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये फ्रँचायझी मालकांचा खेळाडू आणि संघातील अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणे हे योग्य नसल्याचे म्हटले गेले आहे. बरेच खेळाडू संघाची परवानगी न घेता हॉटेलच्या बाहेर जात असल्याचेही समोर आले आहे. त्याचबरोबर आयपीएलच्या या  हंगामादरम्यान खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि संघातील अधिकाऱ्यांच्या सहभागासह गैरवर्तन आणि नियमावलीच्या उल्लंघनाच्या काही घटना घडल्याचे बीसीसीआयच्या निदर्शनास आले आहे.

बीसीसीआयने नेमकं काय म्हटलं आहे

बीसीसीआयने या मार्गदर्शक सूचनेत म्हटले आहे की, ‘जर या घटनांकडे दुर्लक्ष केले गेले तर या स्पर्धेच्या संबंधित फ्रँचायझीच्या आणि नियामक संस्था बीसीसीआययच्या प्रतिष्ठsला मोठी हानी पोहोचवण्याची क्षमता या घटनांमध्ये आहे. शिवाय यामुळे संबंधित व्यक्ती आणि फ्रँचायझींना कायदेशीर जबाबदारी आणि गंभीर स्वरूपाच्या सुरक्षा धोक्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते.

बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा देखरेख पथकाने निदर्शनास आणल्याचे स्वतंत्रपणे जाहीर केल्यानंतर लगेचच ही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. काही खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांनी संघाच्या व्यवस्थापकाची पूर्वपरवानगी न घेता बाहेरील लोकांना त्यांच्या हॉटेलच्या खोल्यांमध्ये प्रवेश दिला होता.

नियमानुसार हॉटेलच्या खोलीत प्रवेश करण्याची विनंती संघाच्या व्यवस्थापकामार्फतच पाठवल्या जाणे आवश्यक असते.‘ व्यवस्थापकच या विनंत्यांना अधिकृत मंजुरी देतात आणि तसेच फ्रँचायझीसोबत प्रवास करणाऱ्या भ्रष्टाचारविरोधी पथक सदस्यालाही त्याबाबत माहिती देतात. अनेक प्रसंगी अशा पाहुण्यांच्या उपस्थितीबद्दल संघाच्या व्यवस्थापकाला काहीच कल्पना नव्हती,’ असे या सूचनेत म्हटले आहे. आता बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, यापुढे खेळाडू किंवा सहाय्यक कर्मचाऱ्याच्या खोलीत प्रवेश करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला संघाच्या व्यवस्थापकाची लेखी परवानगी घेणे आवश्यक असेल. हा नियम कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला लागू असेल. पाहुणे आणि अभ्यागतांची भेट हॉटेलच्या लॉबीमध्येच घेतली जावी, असेही या सूचनेत सुचवण्यात आले आहे.

Comments are closed.