कॅनडामध्ये दांपत्याच्या हत्येप्रकरणी हिंदुस्थानी वंशाचे तीन तरुण दोषी, २८ मे रोजी सुनावण्यात येणार शिक्षा
कॅनडातील अॅबॉट्सफोर्ड येथे एका दांपत्याच्या हत्येप्रकरणी हिंदुस्थानी वंशाच्या तीन व्यक्तींना न्यायालयाने फर्स्ट-डिग्री मर्डरसाठी (नियोजित हत्या) दोषी ठरवले आहे. स्थानिक प्रसारमाध्यम सीबीसी न्यूजने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
ब्रिटीश कोलंबिया सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश ब्रेंडा ब्राउन यांनी शुक्रवारी निकाल देताना स्पष्ट केले की, गुरकरण सिंग, अभिजित सिंग आणि खुशवीर तूर यांनी या दांपत्याच्या हत्येत जाणीवपूर्वक भूमिका बजावली होती. चार वर्षांपूर्वी ही घटना घडली होती.
अभियोक्त्यांनी न्यायालयात सांगितले की, या तिघांनी मिळून दांपत्याची लूटमार आणि हत्या करण्याचा कट रचला होता. त्यांनी घरातून क्रेडिट कार्ड, चेक आणि एक पॉवर वॉशर चोरले होते. ही हत्या आर्थिक हेतूनेच करण्यात आली होती. हा सरकारी वकिलांचा युक्तिवाद न्यायाधीशांनी ग्राह्य धरला. तसेच चोरीचा प्रयत्न फसला आणि त्यातून हे मृत्यू झाले, हा बचाव पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावला.
दोषी ठरलेले हे तिन्ही तरुण २० ते २९ वयोगटातील असून ते अभिजित सिंग याच्या मालकीच्या एका क्लीनिंग कंपनीत काम करत होते. या कंपनीने यापूर्वी मृत डी जोंग दांपत्याच्या घरी क्लिनिंगचे काम केले होते. खटल्याच्या सुरुवातीला या तिघांनीही स्वतःला निर्दोष असल्याचे म्हटले होते. घटनेच्या वेळी अर्नोल्ड डी जोंग यांचा मृतदेह एका बेडरूममध्ये आढळला होता, त्यांच्या डोक्याला आणि तोंडाला डक्ट टेपने गुंडाळले होते. तर जोआन यांचा मृतदेह दुसऱ्या बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. दोघांचेही हात-पाय दोरीने बांधलेले होते.
तपासादरम्यान घटना स्थळावरून मिळालेले डीएनए अर्नोल्ड यांना बांधण्यासाठी वापरलेली दोरी आणि संशयितांच्या वाहनातून जप्त केलेली धातूची बेसबॉल बॅट यांसारख्या परिस्थितीजन्य पुराव्यांनी या तिघांचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध केला. याव्यतिरिक्त अभिजित सिंग याने हत्येच्या बातम्या वाचल्यानंतर इंटरनेटवर कॅनडामध्ये खुन्यांना कशी शिक्षा दिली जाते? यासंदर्भात शोध घेतल्याचे फोन डेटाच्या पुराव्यातून समोर आले. या तिन्ही दोषींना २८ मे रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.
Comments are closed.