लोकल ट्रेनच्या दोन मोटरमनचा मृत्यू, कामाच्या अतिरिक्त ताणाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

लोकल ट्रेनच्या दोघा मोटरमनचा एकाच दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अनुज प्रसाद सिंग आणि मोहसिन खान अशी दोघा मोटरमनची नावे असून दोघेही पश्चिम रेल्वेमध्ये कार्यरत होते. मोहसिन यांचा डय़ुटीवर असताना मृत्यू झाला. एकाच दिवशी दोघांना प्राण गमवावा लागल्यामुळे मोटरमनवरील कामाच्या अतिरिक्त ताणाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मागील काही वर्षांपासून लोकल ट्रेनचे मोटरमन आणि ट्रेन मॅनेजरच्या कामाच्या वेळेत सुधारणा करण्याची मागणी होत आहे. मोटरमनना वर्षाचे 365 दिवस सुट्टीशिवाय काम करावे लागते. त्यात कामाचे शेडय़ुल त्रासदायी असल्याने मोटरमनच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. याचदरम्यान कामाचा अतिरिक्त ताण मोटरमनच्या जिवावर बेतू लागल्याने खळबळ उडाली आहे. पश्चिम रेल्वेतील मोटरमन अनुज प्रसाद सिंग आणि मोहसिन खान या दोघांचा 5 मे रोजी या एकाच दिवशी मृत्यू झाला.

चर्चगेट लॉबीमध्ये मंगळवारी शोकसभा

दोघा सहकाऱ्यांच्या मृत्यूमुळे मोटरमन आणि ट्रेन मॅनेजरना मोठा धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या मंगळवारी सायंकाळी 4 वाजता चर्चगेट येथील मोटरमन लॉबीमध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकलच्या विस्कळीत वेळापत्रकाचा परिणाम

गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वेप्रमाणे पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत. गाडय़ांच्या विलंबाचा थेट मोटरमनच्या विश्रांतीच्या वेळेवर परिणाम होत आहे. मोटरमनना नाश्ता वा जेवण्यासही वेळ मिळत नाही. त्यामुळे मोटरमन, ट्रेन मॅनेजरच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागला आहे. गेल्या डिसेंबरपासून आतापर्यंत 8 मोटरमन वैद्यकीयदृष्टय़ा ‘अनफिट’ ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Comments are closed.