वैभव सूर्यवंशीचा पॉवरप्लेमध्ये षटकारांचा पाऊस, आयपीएलमधील सर्व जुने विक्रम मोडले!
आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशी सातत्याने नवे विक्रम करताना दिसत आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने शनिवारी गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या 16 चेंडूत 36 धावांची तुफानी खेळी केली. आपल्या डावातील पहिल्याच चेंडूवर त्याने मोहम्मद सिराजला षटकार ठोकत खाते उघडले. वैभवने या खेळीत 3 चौकार आणि 3 षटकार लगावले.
या तीन षटकारांच्या जोरावर वैभव सूर्यवंशी आयपीएल इतिहासात एका हंगामात पॉवरप्लेमध्ये 30 षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम अभिषेक शर्माच्या नावावर होता. अभिषेकने आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना पॉवरप्लेमध्ये 29 षटकार ठोकले होते. विशेष म्हणजे, चालू हंगामातही अभिषेकच्या नावावर पॉवरप्लेमध्ये 27 षटकार आहेत.
230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वैभवने छोटेखानी पण आक्रमक खेळी करत यंदाच्या हंगामातील आपल्या षटकारांची संख्या 40 वर पोहोचवली. आयपीएलच्या एका हंगामात 40 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा तो अभिषेक शर्मानंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. अभिषेक शर्माने आयपीएल 2024 मध्ये 16 सामन्यांत 42 षटकार ठोकले होते.
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम अजूनही ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने 2012 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना 15 सामन्यांत तब्बल 59 षटकार मारले होते. तसेच 2013 मध्येही त्याने 51 षटकार ठोकले होते. या यादीत दुसऱ्या स्थानावर आंद्रे रसेल आहे. रसेलने आयपीएल 2019 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून 14 सामन्यांत 52 षटकार मारले होते.
दरम्यान, आयपीएल 2026 मध्ये 40 षटकार पूर्ण करण्यापूर्वी वैभव सूर्यवंशी टी-20 क्रिकेटमध्ये 100 षटकार पूर्ण करणारा पहिला किशोरवयीन खेळाडूही ठरला. त्याला या विक्रमासाठी फक्त एका षटकाराची गरज होती आणि त्याने राजस्थानच्या डावातील 0.2 षटकातच मोहम्मद सिराजला षटकार ठोकत ही ऐतिहासिक कामगिरी पूर्ण केली.
Comments are closed.